Breaking News

विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा वापर शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी करावा : डॉ. भोसले

कराड, दि. 15 - कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाविन्याचा ध्यास घेत कृषि क्षेत्रात नवनवीन संशोधन करावे व शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक धोंडीराम जाधव, दिलीपराव पाटील, पै. शिवाजीराव जाधव, संजय पाटील, निवासराव थोरात, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, मनोज पाटील, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, प्र. कार्यकारी संचालक मुकेश पवार उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांची प्रगती ही संस्थेची प्रगती आहे. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून आपले करिअर बनवावे. कृष्णा कृषी महाविद्यालय हे भविष्यकाळात सर्व कृषी महाविद्यालयांपेक्षा दहा पावले पुढे राहणार आहे. या महाविद्यालयास देशातील सर्वोत्कृष्ठ कृषी महाविद्यालय बनवायचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन करून महाविद्यालयाचा नावलौकीक वाढवावा. विद्यार्थ्यांना या संशोधनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करावे, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
प्राचार्य डॉ. जाधव म्हणाले, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालयाची इमारत उभारली आहे. यात 13 सुसज्ज प्रयोगशाळा, लायब्ररी, सेमीनार हॉल, भव्य क्रिडांगण यांचा समावेश आहे. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर चांगली कामगिरी केली आहे. तसेच भविष्यात महाविद्यालयात नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवू, अशी ग्वाही प्राचार्य डॉ. जाधव यांनी दिली.
प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविकात महाविद्यालयाचा प्रगतीचा आढावा घेतला. प्रारंभी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षातील गुणवत्तााधारक व क्रीडा स्पर्धा विजेत्यांच्या सत्कार चेअरमन डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अमृता गुरव व विनायक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा स्पर्धा अहवाल क्रीडा निमंत्रक वैष्णवी खोमणे, विद्यार्थी परिषद अहवाल कार्याध्यक्षा आरती चव्हाण यांनी सादर केले. तुकाराम सदगर यांनी आभार मानले.