Breaking News

वास्तू संग्रहालयाच्या आवारात एटीएमचा शुभारंभ

अहमदनगर, दि. 30 - जिल्हाधिकारी कार्यालय परिसारात स्टेट बँकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या ए.टी.एम. सेवेमुळे अनेकांची मोठी सोय होणार आहे. जिल्ह्यातील विविध भागातून अनेक नागरिक हे जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येत असल्याने ऐनवेळी पैशांची आवश्यकता भासल्यास लांब जावे लागत होते. या एटीएममुळे ही गैरसोय दूर होणार आहे. तसेच हा शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने व जवळच बाजारपेठ असल्याने या भागात एटीएमची आवश्यकता होती. स्टेट बँकेने नागरिकांची गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरु करुन सेवा देण्याचे एक चांगले पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाच्या आवारातील स्टेट बँकेच्या एटीएम सुविधेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी कार्य.विश्‍वस्त डॉ.रविंद्र साताळकर, अभिरक्षक संतोष यादव, रिजनल मॅनेजर दिनकर वरग, महेंद्र मोहिते, कारभारी चिंते, भुषण गायके, संदिप सरोवरे, मेघश्याम इंजेवार आदि उपस्थित होते. यावेळी रिजनल मॅनेजर दिनकर वरग म्हणाले, या भागात एटीएम संबंधी अनेक दिवसांची मागणी होती. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केलेल्या सहकार्याने ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची जागा उपलब्ध झाल्याने ते लवकर कार्यान्वित झाले. त्याचा नागरिकांना मोठा उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन सविता देशमुख यांनी केले. आभार संतोष यादव यांनी मानले.