Breaking News

सातारा जिल्ह्यातील वाळू ठेक्यासाठी 25 रोजी वाळू लिलावासाठी बोली

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, कराड तसेच फलटण तालुक्यातील 24 वाळू ठेक्यांसाठी जिल्हा खणीकर्म विभागाने ई ऑक्शन लिलाव प्रक्रिया राबवली आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्याची 21 एप्रिलपर्यंत नावनोंदणीची शेवटची मुदत होती. 24 रोजीपर्यंत वाळू ठेकेदारांना ई निविदा भरता येणार असून 25 रोजी वाळू ठेक्यांच्या लिलावासाठी बोली लावण्यात येणार आहे.
महसूल विभागातर्फे वेळोवेळी राबविलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला ठेकेदारांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. महसूल विभागाने 24 रोजीपर्यंत 24 वाळू ठेक्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबवली. त्यात कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर-ब्रह्मकुमारी व रहिमतपूर-मुलाणकी, सातारा तालुक्यातील चिंचणेर सं. निंब, सोनगाव सं. निंब, खटाबरा, क्षेत्र माहुली, बुरुज-चांदखण डोह, जैतापूर, गोजेगाव, तासगाव, पाटखळ व कामेरी या 8 वाळू ठेक्यांचा लिलाव प्रक्रियेत समावेश असणार आहे. फलटण तालुक्यातील आसू, सोनगाव, रावडी बु। साठे हे 4 वाळू ठेके तर, कराड तालुक्यातील गोवारे, खुबी, घोणशी-कोपर्डे, बेलवडे-हवेली-शिरवडे-बेलवडे-हवेली, कालगाव-पेर्ले, रेठरे बु। मधील 5 अशा 10 वाळू ठेक्यांचा लिलाव होणार आहे.
वाळू ठेक्यांचा लिलांवासाठी ई-निविदा व ई-ऑक्शन प्रक्रिया राबवली आहे. या प्रक्रियेत भाग घेणार्‍या वाळू ठेकेदारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्याकरीता वैध ई मेल आयडी, पॅनकार्ड टीन नंबर तसेच नियमित आयकर भरत असल्याचा पुरावा आवश्यक आहे. नोंदणीसाठी 2 हजार 875 रुपये नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ई-निविदा नमुना फॉर्म, वाळू गट यादी, कार्यवाही शुल्क 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास 6 हजार 553 रुपये व 10 लाखांपेक्षा कमी किंमत असल्यास 3 हजार 553 रुपये परतावा, असे राहील. लिलावात भाग घेण्यासाठी वाळू गटाची अपसेट प्राईजच्या 25 टक्के रक्कम व कार्यवाही शुल्काची रक्कम जिल्हाधिकार्‍यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने जमा करणे आवश्यक आहे. जे ठेकेदार ज्या वाळू ठेक्यासाठी लिलावासाठी ई-निविदा ही ई-ऑक्शन झाल्यानंतर खुली करण्यात येईल. निविदा व लिलाव दोन्ही प्रकारात सर्वाधिक जादा दर देणार्‍या ठेकेदाराला लिलाव देण्यात येणार आहे. स्वामित्वधनाच्या 10 टक्के रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावावर धनादेशाद्वारे जमा करणे बंधनकारक आहे. वाळू ठेक्यांच्या लिलावाची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया 21 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. 24 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित वाळू ठेक्यांसाठी ई-निविदा सादर करण्याची मुदत आहे. 26 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ई-ऑक्शनचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.