Breaking News

प्रवाशाच्या प्रसंगावधनामुळे रेल्वे उडवण्याचा कट उधळला !

मुंबई, 30 - मुंबई-वाराणसी या दोन शहरांदरम्यान धावणारी महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट उधळून लावण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. केवळ एका प्रवाशाच्या प्रसंगावधनामुळे हा अनर्थ टळला आहे, अन्यथा कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडणारच होती. दरम्यान एनआयए, रेल्वे पोलिस आणि एटीएसने या घटनेचा तपास सुरु केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री वाराणसीहून महानगरी एक्सप्रेस ही मुंबईकडे येत होती. ही गाडी मध्य प्रदेशातील सटणा परिसरातून मुंबईच्या दिशेने धावू लागल्यानंतर याच रेल्वेतून प्रवास करणा-या एका प्रवाशाला हिरव्या रंगात गुंडाळलेली एक वस्तू दिसली. प्रथम त्याने उत्सुकतेने पाहिले तर वायरिंगसारखे काहीतरी दिसले. त्यामुळे ही वस्तू संशयास्पद असल्याचे त्याला जाणवले. या प्रवाशाने लगलीच याबाबतची माहिती रेल्वेच्या सुरक्षा दलाला दिली. या वस्तूची पाहणी केली असता हा एक शक्तिशाली टाईमबॉम्ब असल्याचे रेल्वेच्या लोकांच्या लक्षात आले.ही वस्तू ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली. त्यावेळी एक पत्रही दिसून आले. बॉम्बची तपासणी केली असता तो टाईमबॉम्ब असल्याचे लक्षात आले. तसेच या टाईमबॉम्बवर रात्री 10 वाजून 40 मिनिटांची वेळ होती. महानगरी एक्सप्रेस ही गाडी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी कल्याण रेल्वे स्थानकावर पोहचणार होती. त्यामुळे या टाईमबॉम्बद्वारे कल्याण रेल्वे स्थानकात स्फोट घडवून आणण्याचा कट होता असे तपास यंत्रणांच्या लक्षात आले. यानंतर तपास यंत्रणांनी हा बॉम्ब ताब्यात घेऊन मोकळ्या जागेत निष्क्रिय करण्यात आला. त्यावेळी त्या मोकळ्या जागेत चार मोठमोठे खड्डे
पडल्याचे दिसून आले. जर हा बॉम्ब रेल्वे गाडीतच राहिला असता तर फार मोठा अनर्थ घडला असता.