Breaking News

समाजकल्याण कर्मचारी लाच घेतांना अटक

बुलडाणा, दि. 29 -  कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेचा उर्वरित वीस टक्के रकमेचा चेक व खरेदीची नक्कल देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलडाणा येथील समाज कल्याण कार्यालयाचा कनिष्ठ लिपिक अरुण इंगळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. तालुक्यातील किन्ही महादेव येथील सदाशिव नामदेव दांदळे यांची पत्नी शीला यांच्या नावाची गट नंबर 170 मधील 1.99 हेक्टर आर शेती कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेंतर्गत 17 एप्रिल 2017 रोजी शासनास खरेदी करून देण्यात आली आहे. त्या मोबदल्यात शासनाच्या वतीने कर्मचारी अरुण इंगळे यांनी 80 टक्के रकमेचा 11 लाख 79 हजार 672 रुपयांचा चेक दिला. परंतु उर्वरित वीस टक्के रकमेचा 2 लाख 94 हजार 918 रुपयांचा चेक व खरेदीची नक्कल देण्यासाठी अरुण इंगळे यांनी 25 हजारांची लाच मागितली. तडजोडीनंतर 15 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीने गुरुवारी सापळा रचला. पंधरा हजार रुपये घेताच पोलीस अधीक्षक अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलीस अधीक्षक विलास देशमुख व पोलीस उपअधीक्षक व्ही.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.बी. भाईक, एएसआय श्याम भांगे, पोहेकॉ रवींद्र लवंगे, संजय शेळके, संतोष यादव व विजय वारुळे यांनी आरोपीस रंगेहात पकडले.