Breaking News

काश्मीर तिढा सोडवण्यासाठी वाजपेयींच्या धोरणाची गरज : मेहबूबा मुफ्ती

नवी दिल्ली, दि. 24 - जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपचा महबूबा मुफ्ती सरकारला पाठिंबा राहणार हे स्पष्ट झालं आहे. तसेच काश्मीरमधील तिढा सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी वापरलेल्या धोरणाची गरज असल्याचं मुफ्ती यावेळी माध्यमांना सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोर्‍यात सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरलेली आहे. दगडफेकीच्या घटनांमुळे काश्मीर खोर्‍यातील शाळा आणि महाविद्यालये  बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मेहबूबा मुफ्तींचं सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यातच केंद्र सरकारही मेहबूबा मुफ्ती सरकारवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती.
अखेर आज पंतप्रधान मोदी आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर मेहबूबा मुफ्तींचे सरकार स्थिर असल्याचं स्पष्ट झालं आहे. या भेटीनंतर काश्मीर खोर्‍यात शांतता गरजेचं असल्याचं सांगून मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेची गरज आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकरानेही फुटीरतावाद्यांशी चर्चा केली होती. वाचपेयींच्या काळातील याच नितीचा वापर काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केला पाहिजे.’’ दरम्यान, मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही मेहबूबा मुफ्ती भेट घेणार आहेत. या भेटीत काश्मीर खोर्‍यातील सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीच्या घटनांसंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरुन दंगली भडकवण्याच्या मुद्द्यावरुनही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं मुफ्ती यांनी यावेळी सांगितलं.