Breaking News

शेतकरी टू ग्राहक... ‘नाम’ची धान्य महोत्सवाचे आयोजन!

ठाणे, दि. 24 - तूर खरेदी होत नसल्याने एकीकडे राज्यातील शेतकरी हवालदिल असताना, अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ फाऊंडेशनने एक अनोखी आयडिया मांडली आहे. ‘नाम’ने ठाण्यात ‘धान्य महोत्सव’ भरवला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहक थेट शेतकर्‍यांचा माल खरेदी करु शकतील. नाम फाऊंडेशन, संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने अभिनेते मकरंद अनासपुरे हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
‘नाम’ फाऊंडेशन येत्या 1 मे पासून ठाण्यात धान्य महोत्सव भरवणार आहे. यामध्ये सुमारे 400 शेतकर्‍यांचा सहभाग असेल. शेतकर्‍यांना दिलासा मिळण्यासाठी ग्राहकांनी थेट माल खरेदी करावा आणि बळीराजाला मदत करावी, असा या धान्य महोत्सवामागचा उद्देश आहे. बळीराजाला मदत व्हावी यासाठी ठाण्यात दोन ठिकाणी नाम फाऊंडेशन आंबा मोहोत्सवासोबत धान्य महोत्सव सुरू करणार आहे. ठाण्यातील धान्य महोत्सवाला यश मिळालं, तर हाच उपक्रम राज्यभर घेणार असल्याची माहिती नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी दिली. दरम्यान, तुरीचा प्रश्‍न राज्य सरकारने सोडवलाच पाहिजे, अशी मागणी यावेळी मकरंद अनासपुरे यांनी केली.