Breaking News

अंबवडेतील बंधार्‍यांची कामे निकृष्ट झाल्याचा आरोप

वडूज, दि. 17 (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील अंबवडे येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात येणार्‍या सिमेंट बंधार्‍यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून या बंधार्‍यांची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर इंगवले यांनी केली. 
अंबवडे येथील पाण्याचा मळा येथे गाव ओढ्यावर शासनाच्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत दीड वर्षांपूर्वी नवीन बंधारा बांधण्यात आला. बंधाराचे काम अत्यंत निकृष्ट असून व अंदाज पत्रकाप्रमाणे परिपूर्ण नाही. त्यामुळे या बंधार्‍यात पाणी साठत नाही. या बंधार्‍यांचे काम सुरु झाल्यापासून परिसरातील शेतकरी प्रशासनाकडे याबाबत तक्रारी दिल्या होत्या. बंधार्‍याचे काम अजून अपूर्ण अवस्थेत असून पाणी साठवण क्षेत्रात असलेले मुरुमाचे व गाळाचे  मोठे ढीग काढले नसल्याने बंधार्‍यांची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे ती काढून तेथील खोली वाढवणे आवश्यक आहे. परंतू, तसे काही करण्यात आले नाही.
यापूर्वी लेखी तक्रारी देवूनही कारवाई झाली नाही. बंधार्‍याचे काम केलेल्या ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा इंगवले यांनी दिला आहे.