Breaking News

फलटण तालुक्यातील साखरवाडी पाणीपुरवठा योजना कागदपत्रे गायब

फलटण, दि. 17 (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील साखरवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सरपंच विक्रम भोसले यांनी आढावा बैठकीत केल्याने सारे सभागृहच अवाक झाले. सुमारे 12 वर्षांपूर्वीच्या या योजनेची कागदपत्रे गायब झाल्याचे सांगून तत्कालिन पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी पूर्वी काय झालं हे काढत न बसता विकासकामांना सुरुवात करण्याच्या सुचना ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांना दिल्या.  
फलटण पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयातील सभागृहात पाणीपुरवठा योजनांबाबत आढावा बैठक झाली. सभापती सौ. रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय अनपट, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, जिल्हा परिषदेचे अधिकारी, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत संजीवराजे साखरवाडी येथील आढावा घेताना सरपंच विक्रमसिंह भोसले यांनी पाणी पुरवठा योजनेत समावेश असलेल्या वस्त्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. या योजनेची पूर्तता गेल्या बारा वर्षापूर्वी झाली. पण, योजनेची कागदपत्रेच गायब असल्याचे सांगितले. दोन महिलांकडून संबंधीत पदाधिकार्‍यांकडून कागदपत्रे पोबारा केली आहेत, असे म्हटले जाते. बाबा, आता खरं काय? तुम्हीच ओळखा, असे म्हणत सरपंच विक्रम भोसले यांनी स्पष्ट केल्यानंतर सभापती सौ. रेश्मा भोसले या अवाक झाल्या. दरम्यान, तत्कालीन पदाधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अशा सुचना अधिकार्‍यांनी दिल्या.
कापशी, ता. फलटण येथील पाणी पुरवठा योजना 11.81 लाख रुपयांची आहे. परंतू, योजना अर्धवट पूर्ण झाली असून फक्त 6 लाखांचे काम झाले असल्याचे ग्रामसेवकांनी निदर्शनास आणून दिले. यावर मार्गदर्शन मागितल्यास अधिकारी कानावर हात ठेवत असल्याचा आरोप सरपंचांनी केला. जिंती ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी पाणी पूरवठा योजना अद्याप अपूर्ण असल्याचे सांगितले. दोनच वस्त्यांना पाणी पोहोच होते. सध्या गावातील तिन्ही विहीरी कोरड्या असल्याने जिंतीसाठी टँकरची मागणी रणवरे यांनी केली.