Breaking News

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटला

कराड, दि. 15 (प्रतिनिधी) : सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणार्‍या टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या पाईपलाईनचा गुरुवारी व्हॉल्व्ह फुटल्यामुळे टेंभू गावच्या हद्दीत सुमारे 30 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. दिवसभर दुरुस्तीचे काम सुुरु न झाल्याने रात्री उशीरापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. दरम्यान, याच परिसरात आणखी दोन व्हॉल्व्ह नादुरुस्त झाले असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात असताना टेंभू उपसा सिंचन योजनेचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. 
सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी जमीन ओलिताखाली आणण्यासाठी कराड तालुक्यातील टेंभू येथे कृष्णा नदीवर टेंभू जलसिंचन योजना उभारली आहे. या योजनेच्या माध्यमातून या तीन जिल्ह्यांतील जवळपास 79 हजार हेक्टर कायम दुष्काळी जमिनीला पाणी देण्यात येत आहे. सध्या तीव्र उन्हाळा असून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी टेंभू योजनेच्या माध्यमातून रात्रंदिवस पाणी उपसा केला जात आहे. बुधवारी रात्री टेंभू गावच्या हद्दीत रेल्वेलाईनजवळ पाईपलाईनचा एक व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने रात्रभर पाण्याचे फवारे उडत होते. गुरुवारी सकाळी नादुरुस्त झालेल्या व्हॉल्व्हच्या शेजारील दुसरा व्हॉल्व्ह फुटल्याने 30 फुटांपेक्षा उंच पाण्याचे फवारे उडत होते.