Breaking News

राज्यात मुलींचा जन्मदर घटला

मुंबई, दि. 15 -राज्यातील मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या नागरी नोंदणी अहवालानुसार 2015 साली महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 1000 मुलांमागे 907 मुलींचं होतं. मात्र 2016 या वर्षात या गुणोत्तरात जवळपास 8 टक्क्यांची घट झाली आहे. 2016 मध्ये राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात घट पाहायला मिळत आहे. यात वाशिम जिल्हा आघाडीवर असून वाशिममध्ये लिंग गुणोत्तरात 62 टक्क्यांची घट  झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. वाशिमपाठोपाठ पुण्यासह उस्मानाबादमध्ये लिंग गुणोत्तरात घसरण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये 53 टक्क्यांनी  मुलींचा जन्मदर घटल्याचं समोर आलं आहे.
राज्यातील एकंदर लिंग गुणोत्तर घटलं असलं तरीही भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जवळपास 78 टक्क्यांनी वाढला आहे. भंडारा पाठोपाठ परभणी आणि  लातूरमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तसंच प्रमुख महानगरांमध्येही लिंग गुणोत्तरामध्ये घट झाल्याचं या अहवालात स्पष्ट  झालं आहे. सर्वसाधारणपणे 1000 मुलांमागे 951 मुलींचं प्रमाण असणं गरजेचं आहे. हे प्रमाण कमी झाल्यास ती चिंतेची बाब समजली जाते.