भेंडवळ घटमांडणीचे भाकित - अडचणीतही ‘राजा’ कायम
बुलडाणा, दि. 30 - सातपुडा परिसरातील प्रसिध्द अशा भेंडवळ घटमांडणीचे भाकित आज पहाटे साडेपाचच्या सुमारास सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी जाहीर केले. अतिवृष्टीच्या आपत्तीसह यंदा पीक परिस्थीती सर्वसाधारण राहिल. घुसखोरी वाढणार असून सैनिकांची धावपळ होईल. शिवाय राजा अर्थात पंतप्रधान कायम राहणार असले तरी देशासमोरील आर्थिक संकाटांची टांगती तलवार पाहता नरेंद्र मोदींसाठी बुरे दिन येण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत. सुमारे 300 वर्षांची परंपरा असलेली भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आली. सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात चंद्रभान महाराजांचा जय जयकार करीत घटाची आखणी करण्यात आली.
यंदाच्या पावसाळ्यात पहिला महिना साधारण आणि लहरी स्वरूपाचा राहिल. दुसरा, तिसरा महिना चांगला पाऊस. चौथ्या महिन्यात कमी पाऊस सांगितला आहे. देशावर आर्थिक संकट येणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी वाढणार असून परकीय घुसखोरीच्या डोकेदुखीचे आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे सैनिकांची धावपळ वाढणार असल्याचे पुंजाजी महाराज यांनी अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोंदीसाठी हे वर्ष बुरे दिनाचे असल्याचे भाकितही वर्तविण्यात आले आहे.
पिके साधारण, नासाडी अधिक
येत्या हंगामामध्ये मृग नक्षत्रात जुन महिन्यामध्ये लहरी पाऊस, जुलै महिन्यात थोडा जास्त, आँगस्टमध्ये चांगला तर सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडणार असला तरी अवकाळी स्वरूपाचा अंदाज आहे. विदर्भातील शेतकर्यांचे मुख्य पीक असलेल्या कपाशीचे पीक यंदा चांगले येणार असल्याचे सांगण्यात आले. घटामध्ये अंबाडी हे कुलदैवताचे प्रतिक मानण्यात येते. त्यानुसारन घटामध्ये अंबाडी ही विखुरली असल्याने कुलदेवतेचा प्रकोप राहिल. मोठी संकटे ओढावणार. खरीपात पिकांचा राजा समजल्या जाणार्या ज्वारीचे पीक चांगले येईल. घटात ज्वारीचा दाणा घटामध्ये आत बाहेर गेल्याने पिकाची नासाडी होण्याचे संकेत आहेत. ज्वारीचे पीक चांगले तर खरीपाची पिके चांगली असा एक अंदाजही असतो. यावेळी म्हणूनच खरीपाचा हंगाम चांगला राहण्याचे भाकित आहे. तुरीचे पिक चांगले येईल. शिवाय तुरीचा दाणा 32 बोटे आत तसेच घट ओलांडून बाहेर गेल्याने भावात तेजीमंदी राहिल. मुंग विखुरल्याने पिक चांगले येईल. उडदाचे पिकही चांगले येईल मात्र आत फैलल्यामुळे नासाडी संभवते. तिळाचे पीक साधारण मात्र पिकाची खुप नासाडी संभवते. भादली जास्त प्रमाणात असल्याने गंभीर रोगराईची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बाजरी चांगली, जवस ठीक राहिल. गहू घटात आतबाहेर फैलल्याने भावात तेजीचा अंदाज सांगितला आहे. गव्हाच्या पिकावरून रब्बी हंगामाचा अंदाज वर्तविण्यात येतो. गव्हाचे पिक साधारण चांगले असल्याने रब्बी हंगामही साधारण चांगला राहिल. हरभर्याच्या भावात यंदा तेजी राहिल.

