Breaking News

अपंग शिक्षक कर्मचार्‍यांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवू : शालिनीताई विखे

। वाहन भत्त्यासह वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी

अहमदनगर, दि. 09 - शासन निर्णयाप्रमाणे अपंग शिक्षक कर्मचार्यांना आवश्यक सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला आवश्यक सूचना देवून वाहन भत्त्यासह वाहने, उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी ठोस प्रयत्न करू, अशी ग्वाही जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी दिली. शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्या अपंग कर्मचार्यांची यादी तयार करून शिक्षण विभागाला सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
अपंग शिक्षक कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांची भेट घेवून त्यांचा सत्कार केला व विविध समस्या मांडल्या. यावेळी शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले, अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक साहेबराव अनाप, संतोष सरवदे, दत्तात्रय जपे, राजेंद्र औटी, किरण माने, पोपट धामणे, दादासाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते.
अपंग शिक्षकांसह विविध विभागातील सुमारे दोनशे कर्मचार्यांचे वाहन भत्त्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. 40 टक्के अपंगत्व असलेल्यांना वाहन भत्ता देय असून याबाबत ऑक्टोबर 2012 मध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र चार वर्षे उलटले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाच्या जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार अपंग कर्मचार्यांना वाहने, उपकरणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नगर जिल्हा परिषदेने अद्याप यासाठी कोणतीही तरतूद केलेली नसल्याचे शिष्टमंडळाने अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. राज्यात अन्य जिल्हा परिषदांनी शासन निर्णयानुसार अपंग शिक्षक कर्मचार्यांना वाहन भत्त्यांसह इतर लाभ मिळवून दिले आहेत. नगर जिल्हा परिषदेत सातत्याने पाठपुरावा करूनही आश्‍वासनाशिवाय काहीच पदरी पडले नसल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. अपंग कर्मचार्यांच्या मागण्यांची दखल घेत अध्यक्षा विखे यांनी सर्व प्रश्‍नांची प्राधान्याने सोडवणूक करण्याची ग्वाही दिली.