Breaking News

सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाचा संदल उरुस उत्साहात

। पारंपारिक वाद्यांसह शहरातून शोभायात्रा

अहमदनगर, दि. 09 - लालटाकी येथील हजरत ख्वाजा सय्यद फकीर मोहंमद शाह चिश्ती (रहे.) दर्गाच्या संदल उरुस निमित्त बज्म ए चिरागे फकीर चिश्ती इंटरनॅशनल (बी.एस.एफ.आय.) संस्थेच्या वतीने शहरातून पारंपारिक वाद्यांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी दर्गाचा संदल उरुस उत्साहात साजरा करण्यात आला.  सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या शोभायात्रेत हाफीज अली चिश्ती, आसिफ अली चिश्ती, मोईन अली चिश्ती आदिंसह जिल्ह्यातील व दक्षिण आफ्रिका (कॅपटाऊन) येथून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपारिक वाद्यांवर धार्मिक गीतांचे सादरीकरण, घोड्यांच्या रथात असलेली फुलांची चादर, उंटावर स्वार युवक शोभायात्रेचे आकर्षण ठरत होते. लालटाकी, सर्जेपुरा, कापड बाजार, पीरशाह खुंट, दाळमंडई व पुन्हा सर्जेपुरा मार्गे लालटाकी येथे दर्गाच्या ठिकाणी शोभा यात्रेचा समारोप झाला. प्रार्थने नंतर दर्गाला संदल व फुलाची चादर अर्पण करण्यात आली. संदल उरुस निमित्त दर्गास आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी भाविकांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. तर संध्याकाळी मुशायरा कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले.