Breaking News

कृषी महोत्सवातून प्रगत तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचते : ना. खोत

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) : शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव घेण्याचा निर्णय घेतला. या महोत्सवांच्या माध्यमातून प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविण्यात येणार असून यातून शेतकर्‍यांची प्रगती होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
कराड कृषी उत्पन्न बजार समितीतर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कराड पंचायत समिती सभापती शालन माळी, उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, उपसभापती आत्माराम जाधव, महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, मारुती यादव, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यावेळी उपस्थित होते.
कृषी महोत्सवाच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचण्यास मदत होते, असे सांगून सहपालकमंत्री खोत म्हणाले, या कृषी महोत्सवातून शेतकर्‍यांना चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे. अशा महोत्सवांमुळे शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. पणनच्या माध्यमातून शेतकर्‍यांना खुली बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विविध जिल्ह्यात आंबा, तांदूळ व धान्य महोत्सव भरविण्यात येते. अशा महोत्सवात शेतकर्‍यांच्या, महिला बचत गटांच्या मालाला चांगला भाव मिळतो. कृषी उत्पन्न बाजार समिती, कराडचे विशेष अभिनंदन करतो. त्यांनी हा महोत्सव भरवून एक चांगले काम केले आहे. शेतकर्‍यांनी विविध जिल्ह्यांमध्ये होणार्‍या कृषी महोत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होवून आपली आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास तानाजी शेवाळे, आकाराम मदने, अनिल पवार, वसंतराव जगदाळे, अनिल मोहिते, प्रभाकर शिंदे तसेच विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.