Breaking News

एटीएम नंबर विचारून कराड तालुक्यातील दोघांना गंडा

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) : बँकेतून बोलत असल्याचा बोगस फोन करत एटीएम नंबर विचारून दोघांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. आगाशिवनगरमधील एकाच्या खात्यावरील 3 लाख 51 हजार 926 रुपयांची रोकड संशयितांनी लुटली, तर कराडातील एकाच्या खात्यावरील 70 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी शौकतअली अब्दुलगणी पठाण (रा. आगाशिवनगर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शौकतअली अब्दुलगणी पठाण हे आगाशिवनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे राष्ट्रीयकृत बँकांत खाते असून त्यांना 20 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत तीन ते चार वेळा खात्याची माहिती विचारण्यासाठी फोन आले. फोन करणार्‍या संशयिताने शौकतअली पठाण यांना आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगत त्यांच्याकडून एटीएमवरील नंबर माहिती करून घेतला. पठाण यांनी एटीएमचे नंबर सांगितल्यानंतर संशयिताने त्यांचे खाते असलेल्या दोन राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यांवरील रकमेवर डल्ला मारला. 3 लाख 51 हजार 926 रूपयांची रोकड लुटली. खात्यावरील रक्कम काढल्याचे लक्षात आल्यावर पठाण यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकिस आला.
दरम्यान, कराड येथील सल्लाउद्दीन निजामउद्दीन बेपारी यांनाही 20 ते 24 एप्रिल या कालावधीत बँकेतून बोलत असल्याचा फोन आला. त्यांनाही एटीएमची सर्व माहिती व नंबर घेण्यात आले. बेपारी यांच्या खात्यावरील 70 हजारांची रक्कम संशयितांनी गायब केली. याप्रकरणी बेपारी यांनी कराड शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.