Breaking News

जावळी तालुक्यातील ऐतिहासिक वडाच्या वनाला भीषण आग

कुडाळ, दि. 29 (प्रतिनिधी) : जावली तालुक्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या म्हसवे येथील वडाच्या वनाला अचानक आग लागली. स्थानिक युवकांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणण्यास यश आले.
आशिया खंडातील क्रमांक दोनचा सर्वात मोठा वटवृक्ष या वनराईत असल्याची नोंद फ्लोरा या जागतिक रेकॉर्डमध्ये आहे. याबाबत विजय शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास येथील वडाच्या वनात आग लागल्याचे स्थानिक युवकांनी पाहिले. या वनात मोठ्या प्रमाणात वाळलेला पाला-पाचोळा व झुडपे असल्याने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी गावातील जेमतेम सहा ते सात युवक आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. आगीच्या ज्वालांचे रौद्ररूप पाहून त्यांनी अन्य ग्रामस्थ, वन विभाग, पोलीस, तहसीलदार यांना कळवले. उपसरपंच अजय शिर्के यांनी सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी त्वरित अजिंक्यतारा कारखान्याच्या अग्निशमन दलाचा बंब पाठवला. त्यापाठोपाठ महाबळेश्‍वर नगरपालिकेचे अग्निशमन बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या सर्व प्रक्रियेला सुमारे तासभराचा कालावधी गेल्या. या कालावधीत या विशाल वटवृक्षाच्या खोडांनी पेट घेतला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी विश्‍वजित शिर्के, किरण शिर्के, अजय शिर्के, विकास पवार, प्रशांत शिर्के, रोहित शिर्के, अंकुश शिर्के, सुनील शिर्के, संतोष शिर्के व स्थानिक युवक ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली.
जावळी पंचायत समितीच्या सभापती सौ. अरुणा शिर्के, सपोनि देविदास कठाळे, ज्येष्ठ नेते तानाजीराव शिर्के, सरपंच शैला शिर्के यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीची पाहणी केली. वनात विविध प्रकारचे 28 हून अधिक पक्षी, वन्य प्राणी, विविध जातींचे साप आढळतात. आगीने पक्ष्यांच्या घरट्यांचे नुकसान झाले.