Breaking News

दक्षिण मांड नदीवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करा : तहसीलदार

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) : पाणी टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडल्याने ठराविक कालावधीसाठी नदीकाठच्या शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याची सुचना तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी वीज वितरण कंपनीला दिली आहे. त्याचबरोबर या योजनेचे थकबाकीदार लोक पुन्हा पाणी उपसा करत असल्याने संबंधितांवर तात्काळ प्रशासकीय कारवाई करा. आवश्यक वाटल्यास नियमानुसार फौजदारी दाखल करण्याची सूचनाही त्यांनी वारणा डावा तीर कालवा उपविभागाला केली आहे. 
वीज वितरण कंपनीचे ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंता आणि व उंडाळे, काले, ओंड येथील वीज वितरण कंपनीच्या शाखाधिकार्‍यांना दिलेल्या आदेशात शेळके यांनी म्हटले आहे की, दक्षिण मांड नदीकाठासह लगतच्या गावांमध्ये टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, म्हणून वाकुर्डे उपसा सिंचन योजनेतून दक्षिण मांड नदीत पाणी सोडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीपंपांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीसाठी खंडीत करण्याची कार्यवाही तात्काळ करावी.
वाकुर्डे योजनेतून पाणी उपसा करणारे थकीत खातेदार आपली थकबाकीची रक्कम न भरता पुन्हा पाणी उपसा करत आहेत. थकीत खातेदारांकडून वसुली झाली नसताना ते सध्या नदीपात्रात सोडलेले पाणी उपसत आहेत. संबंधितांवर नियमानुसार तात्काळ प्रशासकीय कारवाई करा, आवश्यकता वाटल्यास नियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करा.