Breaking News

भाईजींच्या स्वप्नपुर्तीस सहकार्य करा - संदीपपाल महाराज

बुलडाणा, दि. 30 - आशियाखंडात प्रथम क्रमांकाची संस्था म्हणुन नावलौकीक मिळविणार्‍या बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी आपल्या जन्मभुमी डोंगरखंडाळा गावात स्वतःपुढाकार घेवुन गाव विकासाच्या विविध योजना प्रत्यक्षात साकार केल्या आहेत. भविष्यातही गावासाठी भरीव कार्य करण्याची तळमळ ठेवुन डोंगरखंडाळा गांव आदर्श होण्यासाठी ध्यास घेतलेल्या भाईजींच्या स्वप्नपुर्तीस ग्रामस्थांनी सक्रीय सहकार्य करावे असे आवाहन प्रख्यात सप्तखंजेरीवादक ह.भ.प.संदीपपाल महाराज यांनी येथे केले.
बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांचे वडील व डोंगरखंडाळा पंचक्रोशीतील प्रगतीशिल शेतकरी तथा व्यापारी स्व.सेठ देवकिसन चांडक यांच्या 29 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन दि 25 एप्रिल 2017 रोजी डोंगरखंडाळा येथील पणन मैदानावर आयोजीत जाहीर किर्तनात ह.भ.प.संदीपपाल महाराज मार्गदर्शन करीत होते.
प्रारंभी बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक व संस्थेचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्व.सेठ देवकिसन चांडक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सप्त खंजेरीवादक ह.भ.प.संदीपपाल महाराज यांचा शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच किशोर चांडक यांचे हस्ते संदीपपाल महाराज यांच्या संचातील सहकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन सतत सक्रीय असणारे बुलडाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी डोंगरखंडाळा गांव केवळ आदर्शच नव्हे तर गावाची जगाच्या नकाशावर आदर्शगाव म्हणुन ओळख व्हावी यासाठी भाईजींनी विविध विकास योजना गावात राबविण्याचा प्रयत्न केला आहे. भाईजींच्या आदर्श गांव या स्वप्नपुर्तीस सहकार्य करण्याची जबाबदारी डोंगरखंडाळा ग्रामस्थांवर असुन या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नशिल असण्याची गरज ह.भ.प.संदिपपाल महाराज यांनी व्यक्त केली. आपले मनोगत व्यक्त करतांना भाईजी म्हणाले की, डोंगरखंडाळा गावांत 79 टक्के शौचालयाचे काम पुर्ण झाले असुन 21 टक्के शौचालयाचे काम या वर्षभरात पुर्ण करण्याचे आवाहन करून यासाठी बुलडाणा अर्बन मदत करेल, बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत सहकार विद्या मंदिरात डोंगरखंडाळा येथे शिकणार्‍या मुलींना फी मध्ये 50 टक्के सवलत यावेळी त्यांनी जाहीर केली. शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांसाठी 50 हजार ते 1 लाख रू. पर्यंत कर्ज गाई-म्हशीसाठी देण्यात येईल असे सांगुन डोंगरखंडाळा गावासाठी राबविण्यात येणार्‍या विविध विकास योजनांचा ग्रामस्थांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेशकुमार काकडे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास बुलडाणा  अर्बनचे स्थानिक संचालक, पंचक्रोशितील विविध गावातील ग्रामस्थ, स्थानिक ग्रामस्थ, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक सुधीर भालेराव, शाखा व्यावस्थापक अरूण जाधव व त्यांचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.