Breaking News

कुठे आहेत इंडीयन मेडीकल असोशिएशन अन् मार्ड?

कुमार कडलग/नाशिक, दि. 06 - जवळची व्यक्ती रूग्णालयात उपचार सुरू असतांना अचानक जगाचा निरोप घेतो तेंव्हा वियोगाने संतप्त झालेल्या भावना प्रतिक्रियेच्या स्वरूपात उमटतात,डाक्टरांवर श्रध्दा असते,विश्‍वास आहे म्हणून उपचार घेण्यासाठी नातेवाईक रूग्णाला रूग्णालयात आणतात... अनपेक्षितपणे ती अप्रिय घटना घडते तेंव्हा जवळचा माणुस सोडून जाण्याचे दुःख... परिस्थितीने निर्माण केलेल्या शंका भावना संतप्त होण्यास कारण मिळते.या मागे डाक्टरांसंदर्भात समाजात असलेला समज,काही अनुभव कारणीभुत असतात.काही तत्कालीन कारणंही अंतर्भूत असतात.अशा प्रसंगात काही क्षणापुर्वी देवाच्या रूपात असलेला डाक्टर रूग्णाच्या नातेवाईवाईकांना दानव भासू लागतो.आणि हास्पीटल किंवा डाक्टरवर हल्ला होतो.इथे कुठेही पुर्वनियोजन नसते.हे सारं अचानक घडून आलेलं असतं...तत्कालीन परिस्थिती त्या प्रकाराला जबाबदार असते...तरीही ते निषेधार्ह आहेच...पण त्या मागची प्रत्येक घटकाची मानसिकता समजून घ्यायला हवी...
दुसर्‍या बाजूला वेद्यकीय सेवेचा बाजार मांडणार्‍या प्रवृत्ती....जीवदान देणे हे वैद्यकीय व्यवसायाचे व्रत....कमाई हा दुय्यम भाग....काही सन्माननीय अपवाद वगळले तर सारा दलालीचा बाजार....हा बाजार नितीमुल्यांच्या पातळीवर इतका घसरला आहे की जवळून  वाहणार्‍या गटारीपेक्षाही अधिक दुर्गंधी या व्यवसायातीला दलालांच्या कृत्यामुळे येते.या व्यवसायात काही सेवाभावी वृत्तीचे महानुभव हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच असले तरी त्यांच्यामुळे निदान गरीमा टिकून आहे...अन्यथा
असो... अशा प्रवृत्ती केवळ धंदा करून पैसा कमावतात असे नाही तर कायद्याला वैद्यकीय कचर्यात गुंडाळून सामाजिक नितीमुल्यांचाही मुडदा पाडतात,विच्छेदन करतात... उदाहरणच द्यायचे झाले तर डॉ. मुंडे, डॉ, देवरे, डॉ. खिद्रापुरे आणि सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात घडलेले स्री भ्रूण हत्या कांडाचे देता येईल.....मग अशा प्रकरणात सो काल्ड वैद्यकीय संघटनांची नैतिक जबाबदारी काहीच नाही का? का कुणी जाब विचारत नाही या वैद्यकीय व्यवसायातील नराधम प्रवृत्तींना..?
रूग्णाच्या नातेवाईकांनी डाक्टरांवर केलेला हल्ला हा पुर्वनियोजित नसतो,ती तत्कालीन संतप्त प्रतिक्रिया असते..याउलट वर उल्लेख केलेल्या वैद्यकीय व्यवसायातील प्रवृत्ती तो काळा धंदा वर्षानुवर्ष करीत असतात.म्हणजे ते त्यांचे कारस्थान पुर्व नियोजित असते.शासकीय सेवेत असतांना खासगी प्रक्टीस करता येत नाही हा कायदा आहे,तो सर्रास धाब्यावर बसविला जातो.इतकेच नाही तर जेथे खासगी प्रक्टीस सुरू आहे ते रूग्णालय संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणीही केलेले नसते..हे सारं पुर्वनियोजितचा ना.! मग अचानक डाक्टरावर झालेला हल्ला जो पुर्वनियोजित नाही त्या पेक्षा या प्रवृत्ती व्यवसायाच्या नित्तीमुल्यांवर,नैतिकतेवर क्षणाक्षणाला हल्ला करतात तो प्रकार गंभीर नाही का? मग इंडीयन मेडीकल असोशिएशन किंवा मार्ड सारख्या संघटना एरवी संपाचे हत्यार उपसतात,रूग्णांच्या जीवाशी खेळतात,ते सारे आज नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयातील लज्जास्पद प्रकरणात तोंडावर बँडेजपट्टी चिकटल्यागत गप्प का? समाजाचा सवाल आहे.