Breaking News

कुठे गेली बहुजनांची अस्मिता...?

दि. 21, एप्रिल - कोपर्डीत जीजाऊच्या दुर्दैवी लेकीवर ओढवलेला डोकं सुन्न करणारा प्रसंग... मानुषतेलाही लज्जा उत्पन्न होईल असा अत्याचार झाला म्हणून सकल मराठा पेटून उठला. रक्ताळलेल्या भावनांना वाट करून देत न भुतो नभविष्यती ऐक्याचा दाखला सादर केला.साडेचारशे वर्षात मरगळलेली अस्मिता अचानक पेटून उठली.अन् वर्षभर आम्ही आमची पाठ आमच्याच आखडलेल्या हाताने थोपटून घेऊ लागलो... हे सारं थोतांड होत,आहे आणि राहील...कारण आम्ही आमचा राजा डोक्यावर घेतला,डोक्यावर कोरला छातीवर छापला टोपीवर मिरवला अलिशान वातानुकुलीत गाड्यांवर मिरवला...पण त्या राजाला आमच्या डोक्यात ,गंजलेल्या बुध्दीत कधीच शिरू दिले नाही... आमचा राजा आम्हाला कधीच समजला नाही... हेच दुर्दैवी शितलच्या आत्महत्येने सिध्द केले आहे... आता कुठे गेली मराठा म्हणविणार्यांची अस्मिता... का मोर्चे निघत नाहीत हुंड्यासाठी शितलचा बळी घेणार्या त्या नराधमाला जाब विचारण्यासाठी?  का जाब विचारला जात नाही हुंड्याचे पैसे नोकरीसाठी भरण्याची वेळ आणणार्या संस्था चालकांना?... शितलची आत्महत्या प्रातिनिधीक आहे,शितलसारख्या जिजाऊच्या अनेक लेकी रोज आतल्या आत जळत आहेत,चडफडत आहेत... त्यांचे मन कधीच मेले आहे... कुठे गेली आता अस्मिता... का षंढ झाली... एक मराठा लाख मराठा नावाची अस्मिता?
केवव  मराठाच नाही तर बहुजन समाजाची अस्मिता या प्रसंगाने खवळून उठली, गुन्हेगाराला जात नसते हा सिध्दांता पुन्हा पुन्हा ओरखडला जाऊ लागला. हे वातावरण शांत होऊ लागलं तशी ही अस्मिताही थंड झाली. अस्मितेचं जेव्हढ व्हायच होतं तेव्हढ राजकारण झालं होतं. आणखी ही अस्मिता ताणण्यात काहीच अर्थ नाही हे पटल्यानंतर सगळं कसं संथ वाहतं आहे,
प्रश्‍न गुन्हे गारी प्रवृत्ती ठेचण्याचा नाहीच मुळी या नराधम पवृत्तींना ठेचण्यासाठी अस्मिताचा जाहीर संघटीत बाजार मांडण्याचीही आवश्यकता नाही. कायदा त्या साठी समर्थ आहे.
खरा प्रश्‍न आहे तो समाजात सज्जनतेचा आव आणून बहुजनांच्या लेकीचा बळी घेणार्‍या  प्रवृत्तींना ठेचण्याचा. चाली रिती रूढी परंपरा या खुळचट कालबाह्य कल्पनांचा बुरखा पांघरून जीजाऊ, साविञी, रमाईच्या लेकींना कुस्करणार्‍या पांढरपेशी, धनाला चटावलेल्या विषारी नांग्या ठेचण्यासाठी ही अस्मिता का एकवटत नाही...