Breaking News

पांगरमल दारुकांडच्या सीआयडी चौकशीत निवडणुक निर्णय अधिकारीचा समावेश करण्याची मागणी

अहमदनगर, दि. 30 - येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या पांगरमल दारुकांडच्या सीआयडी चौकशीत निवडणुक निर्णय अधिकारी सुधीर पाटील (तहसिलदार) यांचा समावेश करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली.
निवडणुक काळात सुधीर पाटील निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत होते. मतदारांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता, लोकशाही पध्दतीने निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र निवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात दारु वाटप व विक्री घडली. नगर तहसिलच्या कार्यक्षेत्रात असलेले पांगरमल, दरेवाडी व कौडगावात विषारी दारुने अनेकांना जीव गमवावा लागला. विषारी दारु जेथे बनवली गेली ते जिल्हारुग्णालय नगर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आहे. विषारी दारु नगर तालुक्यासह दैठणे गुंजाळ (ता.पारनेर), तरवडी (ता.नेवासा) आदि गावातील नागरिकांना देखील प्राण गमवावे लागले असून, तर काही जणांना कायमस्वरुपी अपंगत्व आले आहेत.
घडलेल्या घटना दुर्देवी असून, या विषारी दारुकांडाने घरातील कर्ते पुरुष गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे. सदर घटना घडण्यापुर्वी संघटनेच्या वतीने निवडणुक काळात पुर्णत: दारुबंदी करण्याची मागणी केली होती. मात्र याची दखल न घेतल्याने सदर प्रकरण घडले. या घटनेला निवडणुक निर्णय अधिकारी देखील जबाबदार असून, ते आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यास असमर्थ ठरल्याने त्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्यांच्या कार्यक्षेत्रात पांगरमल दारुकांड घडले अशा बेजबाबदार अधिकार्यास नाशिक महसुल विभागाने सर्वोत्कृष्ट तहसिलदार म्हणून गौरविले याचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अशोक सब्बन, भा.को. साळवे गुरुजी, सोमनाथ दरंदले आदि उपस्थित होते.