Breaking News

माती परीक्षणाची सुविधा शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मिनी लॅब - बोराळे

अहमदनगर, दि. 17 - शासनाने नगर जिल्ह्यात खासगी क्षेत्रातील 46 व्यक्तींना मिनी लॅब, मृदा, परीक्षक कीट 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे माती परीक्षणाची सुविधा आता शेतकर्‍यांच्या दारापर्यंत उपलब्ध होणार आहे, असे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले. मिनी लॅबचे प्रशिक्षण वर्ग जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे, तंत्र अधिकारी अशोक संसारे, माती परीक्षण अधिकारी शिल्पा गांगर्डे, नागार्जुन अ‍ॅग्रो केमिकल्स कंपनीचे गोविंद राठोड, गौरव पिसोड, निखील शिरोडे, शेतकरी व मिनी लॅबचे संचालक उपस्थित होते.
श्री. नितनवरे म्हणाले की, मिनी लॅबद्वारे बारा घटकांची तपासणी करू शकतो. अल्प खर्चात शेतकर्‍यांच्या दारापर्यंत जाऊन हे माती परीक्षण केले जाते. शेतकर्‍यांच्या दारापर्यंत माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांना स्वस्तात व सहजरित्या अनेक फायदे मिळू शकणार असून, माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. कृषी विभाग शेतकर्‍यांच्या बांधांपर्यंत जाऊन पोहोचला असून, शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी विविध विकासयोजना राबवून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी नागार्जुन अ‍ॅग्रो केमिकल्स कंपनीचे प्रतिनिधी गौरव पिसोड मिनी लॅब वापराची सविस्तर माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी या योजनेसाठी विशेष परिश्रम घेतले असून, त्यांच्या संकल्पनेतून सदरचा प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी करून आभार मानले.