Breaking News

अखंडीत वीज पुरवठयामुळे शेतकरी हैराण; अकोलेत रास्तारोको

। अकोले/प्रतिनिधी । 30 - पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील कळस, परखतपूर, इंदोरी, रुंभोडी, आंबड, उंचखडक बुद्रुक आदी गावांतील संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी काल शुक्रवारी रात्री अचानक पणे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वीज वितरण कंपनीच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनामूळे अकोले शहर वासीयांना ऐन उन्हाळ्यात तास दीड तास अंधाराचा सामना करावा लागला.
शेतकर्‍यांना  गेल्या काही दिवसांपासून पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. काल शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता 3 फेज वीज पुरवठा होणे अपेक्षित असतांना तो होऊ न शकला. या कारणामुळे  महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराला वैतागून अकोले शहराजवळील प्रवरा परिसरातील कळस, उंचखडक व अन्य गावांतील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालया समोर एकत्रित आले. तेथे वीज वितरण कंपनीचा  कुणीही अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी अधिकच संतप्त झाले. संतप्त शेतकर्‍यांनी अकोले संगमनेर रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनाची दखल घ्यायला कुणीही वरिष्ठ अधिकारी नसल्याने शेतकर्‍यांचा पारा अधिकच चढला. नेहमी प्रमाणे पोलिसही घटनास्थळी उशिरा दाखल झाले.
अखेर  सहा. पोलिस निरीक्षक महेंद्रकुमार आहिरे व अगस्ती कारखान्याचे संचालक सुरेश गडाख यांच्या मध्यस्थीने वीज वितरण कंपणीचे प्रभारी शिंदे यांचेशी चर्चा करण्यात आली. आहिरे  व गडाख यांनी बाहेर येऊन आंदोलकांना परिस्थिती सांगितली. मात्र आंदोलकांच्या भावन्स तीव्र असल्याने अधिकार्‍याने बाहेर यावे असा आग्रह धरला गेला. शेवटी येथील वीज वितरण कंपनीचे प्रभारी शिंदे यांनी नगर सबस्टेशन वरूनच वीज पुरवठा खंडित असल्याचे सांगत शेतकर्‍यांची दिलगिरी व्यक्त केली.
सिंगल फेज वीज पुरवठा करण्यात येईल. वीज पुरवठा सुरळीत झाल्या नंतर 3 फेजचा खंडित झालेला वीज पूरवठा वाढवून देण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे अकोले शहराचा बंद केलेला वीजपुरवठा त्यानंतर सुरळीत करण्यात आला.
सुमारे दीड ते दोन तास सुरु असणार्‍या या आंदोलनामुळे कोल्हार घोटी राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती नंतर ती सुरळीत झाली. निळवंडे धरणातून 4 मे रोजी शेतीचे आवर्तन सुटणार आहे. त्यावेळी जर अशाच पद्धतीने वीज कंपनी चा कारभार सुरु राहिल्यास यापेक्षा ही अधिक उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.