अगस्ती आश्रमात हजारोंच्या उपस्थितीत पार पडला सामुदायिक विवाह सोहळा
। अकोले/प्रतिनिधी । 30 - अक्षय्यतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला शुक्रवारी हजारोंच्या जनसमुदायाने अगस्ती आश्रमाला महाशिवरात्रीचे स्वरूप प्राप्त करून दिले. बारा वर वधूंना आजच्या वर्हाडी मंडळींनी भरभरून आशीर्वाद देत अगस्ती आश्रमाची प्रशंसा केली. एकच गलका, कोणाचे कोणाला म्हणणे समजत नाही, लहान मुलांची रडारड व भटजींची अक्षदा वाटण्याची ध्वनिक्षेपका वरील सूचना या सायंकाळच्या मूहर्ताला लगीन घराची आठवण करून देऊन गेली.अगस्ती आश्रमाचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे आणि यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, सेक्रेटरी स्वातंत्र्य सैनिक सुधाकर शाळीग्राम, खजिनदार किसनराव लहामगे, विश्वस्त परबतराव नाईकवाडी, गुलाबराव शेवाळे, संतुजी भरीतकर, दिपक महाराज देशमुख, जयप्रकाश महाले, नवनाथ गायकवाड, सुरेश वाकचौरे, बाळासाहेब भोर, अनिल गायकवाड, भानुदास तिकांडे, विष्णूपंत वैद्य, व्यवस्थापक रामनाथ मुतडक आदींनी हा सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे घरचे कार्य समजून मोठी धावपळ केली व त्याचे पर्यावसन हा सामुदायिक विवाह सोहळा संस्मरनिय ठरला.
यावेळेस माजी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की,लग्नामध्ये अनाठायी खर्च टाळावा, दुष्काळ सदृशय परिस्थिती मध्ये सामुदायिक विवाह सोहळा अंगिकारने ही काळाची गरज आहे. अगस्ती आश्रमाने उचलले सामुदायिक विवाह सोहळ्याचे उचललेले पाऊल यापुढेही यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी नेते दशरथराव सावंत म्हणाले की, लग्नावर खर्च होणारा पैसा उधळ पट्टीचा ठरतो त्याऐवजी नोंदणी पद्धतीचे विवाह याला चांगला पर्याय ठरतील. रामनाथ महाराज जाधव, जेष्ठ नेते मधुकरराव नवले यांनीही यावेळेस वधू वरांना आशीर्वाद दिले. देवस्थानचे अध्यक्ष व अकोले नगर पंचायतचे नगराध्यक्ष अॅड. धुमाळ यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्तविकात आश्रमात सुरु असणार्या विकास कामांचा आढावा घेतला आणि सामुदायिक विवाह चळवळीला या पुढे तालुक्याने भक्कम साथ द्यावी असे आवाहन केले.सूत्रसंचालन प्रा. गणपत नवले यांनी केले तर दीपक महाराज देशमुख यांनी आभार मानले.
या सोहळ्यास जेष्ठ नेते पांडुरंग घुले, मीनानाथ पांडे, गिरजाजी जाधव, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, आप्पासाहेब आवारी, युवक नेते महेश नवले, सतीश भांगरे, सुनील गिते आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
हजारोच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला एक आगळी वेगळी शिस्त होती. व्यवस्थापणातील काटेकोरपणा हे विवाहाचे वेगळे वैशिष्टय ठरले.
