Breaking News

आम्ही सक्षम, हायकोर्टाने कर्जमाफीबद्दल सांगू नये : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 05 - उत्तर प्रदेश सरकारने शेतकरी कर्जमाफी केल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत लावून धरली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिलं.  कर्जमाफी कशी देता येईल, यावर चर्चा सुरु असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
यापूर्वीच सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभं आहे. उत्तर प्रदेशने कर्जमाफी केल्यानंतर, मी अर्थसचिवांना यूपीकडून माहिती मागवण्याचे आदेश दिले आहेत. कर्जमाफीचं मॉडेल काय, ते पैसे कुठून आणि कसा उभा करणार याची माहिती घेण्यास सांगितलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय कर्जमाफी हा आमचा म्हणजेच राज्य सरकारचा विषय आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने सांगण्याची गरज नाही. राज्य सरकार सक्षम आहे, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेवरुनही टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेते बाहेर फिरत आहेत. यात्रा फिरली, कोणी काय केलं माहीत नाही, मला त्याबद्दल बोलायचं नाही. त्यांची संघर्षयात्रा त्यांना लखलाभ होवो, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.