Breaking News

फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण केल्यानेच देश जगात अग्रेसर

। समाजातील अपप्रवृत्ती व भ्रष्टाचाराला जनतेने पायबंद घालण्याची गरज

अहमदनगर, दि. 15 - महात्मा जोतिबा फुले,छत्रपती राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाच्या व दिन दलितांच्या उत्थानासाठी अतुलनिय योगदान दिलेले आहे.त्यांनी स्वतः पलिकडे समाजाचा प्राधान्याने विचार केला.सामान्य दिन दलित,महिलांना शिक्षण व सन्मान मिळवून देण्याचे महान कार्य केले.त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यानेच आपली लोकशाही आज जगात अग्रेसर आहे.नव्या पिढीने महापुरुषांच्या विचारांचे पाईक बनून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य साखर संघाचे अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव नागवडे यांनी केले.
’नागवडे’ कारखाना कार्यस्थळावर महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नागवडे म्हणाले की,डॉ.आंबेडकर यांनी दलितांना गावाबाहेरुन  गावकुसात आणण्याचे मोठे कार्य केले.त्यासाठी उभी हयात त्यांनी संघर्ष केला.शिका,संघटीत व्हा अन् संघर्ष करा ही त्यांची शिकवण आजही अनुकरणीय आहे.देशाची राज्यघटना लिहीताना संपूर्ण देशातील विविध जाती,धर्म ,प्रांत याचा सखोल अभ्यास करुन उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले.समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अद्वितीय आहे.असे सांगून ते म्हणाले जातीनिहाय आरक्षण ही आंबेडकर यांची संकल्पना दिन दलितांना त्यांचे हक्क वअधिकार मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण ठरली.आज त्याची फळे नवी पिढी चाखत आहे. नव्या पिढीने त्यांच्या शिकवणुकीचा अंगीकार करावा. डॉ.आंबेडकर, फुले, राजर्षी शाहू महाराज यांना विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवणे हा त्यांच्या उदात्ततेचा अवमान आहे.कोणत्याही महापुरुषांची जन्माची जात न पाहता त्याने समस्त समाजासाठी केलेल्या कामाचे मुल्यमापन करणे उचित ठरेल असे सांगून नागवडे म्हणाले की,आंबेडकरांची राज्य घटना ही केवळ आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगला मार्गदर्शक आहे.आंबेडकर,फुले,शाहू यांचे सशक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे.जनतेने विश्‍वासाने दिलेल्या सत्तेचा गैरवापर करुन संपत्ती  कमावणा-यांना वठणीवर आणण्यासाठी जनतेत आणखी जागृती  होण्याची गरज असून समाजात फोफावत चाललेल्या अपप्रवृत्ती व भ्रष्टाचाराला पायबंद केवळ सामान्य जनताच घालू शकेल.जनतेने आता या साठी पुढाकार घेवून लोकचळवळ उभी करावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुले, आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रास्ताविक सुरक्षा अधिकारी बाळासाहेब लगड यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर,सुरेश खरात यांची समयोचित भाषणे झाली.यावेळी कारखान्याचे संचालक अ‍ॅड.अशोकराव रोडे,विलासराव काकडे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, आण्णासाहेब थिटे यांच्यासह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी  व परिसरातील नागरिक मोठ्या  संख्येने उपस्थित  होते.
भाऊसाहेब बांदल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर अनिल पवार यांनी आभार मानले.