Breaking News

अनुसूचीत जाती सहकारी संस्थांना अर्थसाह्य योजनेत सहयोग घोटाळा

लातूर (प्रतिनिधी), दि. 23 - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचीत जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसाह्य देवून,मागास घटकांचे सबलीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण निलंगा येथील सहयोग इंडस्ट्रियल को-ऑप.सोसाटीच्या संचालक मंडळाने समाज कल्याणला हाताशी धरुन प्रकल्प पूर्ण न करताच निधी उचलून वेगळ्याच सहयोग जन्माला घातल्याचा आरोप करुन सामाजिक कार्यकर्ते माधव सूर्यवंशी यांनी या सहयोगाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी दि.4 मे 2017 पासून समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
 राज्यातील मागास घटकांचे आर्थिक सबलीकरण व्हावे म्हणून शासन अनेक निर्णय घेत असते, पण त्यांची अंमल करणारी यंत्रणा आणि या योजनांचा चुकीच्या मार्गाने लाभ उठवणारे ढोमकावळे काही कमी नाहीत,पण या कृतीला कोणीतरी जाणकाराने रोखणे आवश्यक असते.निलंगा येथील सहयोग इंडस्ट्रियल को-आपॅ.संस्थेच्या संचालक मंडळाने अनुसूचीत जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसाह्य योजनेचा प्रस्ताव तयार करुन बोगस अहवाल तयार करुन,समाज कल्याण अधिकार्‍यांना हाताशी धरुन लाखोंचे अनुदान लाटले. दि.25 ऑगस्ट 2009 च्या शासन निर्णयानुसार सदरील योजनेतील इमारतीचे काम 52 आठवड्यात होणे आवश्यक होते. पण ते पूर्ण तर सोडाच संबंधित संस्थेने विहीत मुदतीतही पूर्ण केलेेले नाही.तर अर्धवट काम करुन संमनमताने शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते माधव सूर्यवंशी यांनी या निवेदनात केला आहे.
 शासनाच्या रकमेचा बोगस कागदपत्राआधारे लाभ उचलणार्‍या  संबंधित सहयोग संस्था संचालक आणि समाज कल्याण अधिकार्‍यांची चौकशी होवून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत सूर्यवंशी यांनी यासाठी दि.4 मे 2017 पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,डालडा फॅक्टरी परिसर,लातूर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दि.21 एप्रिल 17 रेाजी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या  निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी,राज्याच्या समाज आयुक्तांनाही दिलेल्या आहेत.