संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे जिल्हास्तरीय निकाल घोषित
शेळगाव गौरी, लहान व कामळज ग्रामपंचायतीचे यश
शाहु फुले आंबेडकर दलित वस्तीमध्ये पांडूर्णी ग्राम पंचायत अव्वल
नांदेड, दि. 08 - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतंर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पंचायत पुरस्कार दिले जातात. सन 2016-17 चे जिल्हास्तरीय समितीने आज निकाल जाहीर केले. यात नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी ग्राम पंचायत प्रथम, अर्धापूर तालुक्यातील लहान व्दितीय तर लोहा तालुक्यातील कामळज ग्राम पंचायतीने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छतेसाठी प्रेरीत करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येते. नव्या स्वरुपात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2016-17 पासून सुरु करण्यात आले आहे. नव्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळावर शंभर टक्के हागणदारीमुक्त झालेली गावेच या अभियानात सहभागी होण्यासाठी पात्र ठरु शकतात. त्यानुसार तालुकास्तरीय तपासणीत पात्र ठरलेल्या ग्राम पंचायतींची जिल्हास्तरीय तपासणी पथकाने गावांची पाहणी करुन आज निकाल जाहीर केले.
यात नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी ग्राम पंचायतीने पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, व्दितीय क्रमांकाचे तीन लाखाचे पारितोषिक अर्धापूर तालुक्यातील लहान ग्राम पंचायतीने तर लोहा तालुक्यातील कामळज ग्राम पंचायतीने तृतीय क्रमांकाचे दोन लाखाचे पारितोषिक पटकावले आहे. तसेच या अभियानांतंर्गत विशेष पुरस्कार दिले जातात. यात सामाजिक एकतेसाठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार माहूर तालुक्यातील तुळशी ग्राम पंचायत, सांडपाणी व पाणी गुणवत्तेसाठी दिला जाणारा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार नायगाव तालुक्यातील चारवाडी तर कुटूंब कल्याणसाठी दिला स्व. आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार बिलोली तालुक्यातील टाकळी खूर्द ग्राम पंचायतीस देण्यात आला आहे.
शाहु फुले आंबेडकर दलित वस्तीमध्ये पांडूर्णी अव्वल
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गावात दलित वस्ती सुधार अभियानांतंर्गत शाहु फुले आंबेडकर नावांनी पुरस्कार दिले जातात. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियनात सहभागी झालेल्या गावातून दलित वस्त्यांची तपासणी करुन हे पुरस्कार दिले जातात. यात मुखेड तालुक्यातील पांडूर्णी ग्राम पंचायतीने प्रथम, किनवट तालुक्यातील फुलेनगर ग्राम पंचायतीने व्दितीय तर हदगाव तालुक्यातील उमरी खूर्द ग्राम पंचायतीच्या दलित वस्तीमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
