Breaking News

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस : आयएमडी

नवी दिल्ली, दि. 18 - देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला. अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं.
राजकीय नेत्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत, शेतकर्‍यांपासून कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीईओपर्यंत आणि अर्थतज्ज्ञांपासून ते शेअर बाजारातल्या व्यापार्‍यांपर्यंत सर्व जण  मान्सूनच्या या अंदाजाकडे डोळे लावून बसले होते. आयएमडीच्या या अंदाजानंतर सर्वांना दिलासा मिळाला. मागच्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या  106 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला होता. आयएमडीच्या दुसर्‍या अंदाजातही सरासरीपेक्षा जास्तच पाऊस राहील असं भाकीत होतं. मात्र  मागच्या वेळी सरासरीच्या 97 टक्के इतका पाऊस पडला.
अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी यावेळी अलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता 50 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्त केली आहे. शिवाय स्कायमेट या देशातल्या खासगी  संस्थेनेही यावेळी अल निनोमुळे सरासरीपेक्षा थोडा कमीच पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. अल निनो म्हणजे काय तर प्रशांत महासागरात अचानक  उष्मा वाढल्याने वातावरणात जे असामान्य बदल घडून येतात, ज्याचा मान्सूनच्या वाटचालीवरही परिणाम होतो. भारतात जून ते सप्टेंबर या काळात जवळपास  70 टक्के पाऊस नैऋत्य मान्सून वार्‍यांमुळेच पडतो, ज्यावर देशातली बहुतांश शेतीचं सिंचन अवलंबून आहे.