Breaking News

बनावट कर्ज प्रकरणी कृष्णाच्या 8 माजी सदस्यांना अटक

कराड, दि. 17 (प्रतिनिधी) : तोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्जप्रकरणी कराड तालुक्यातील शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्षांपाठोपाठ आठ माजी संचालकांना अटक करण्यात आली. त्यापैकी तिघांना पोलीस कोठडी, तर पाच जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना बनावट कर्जप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर अचानक 8 माजी संचालकांना अटक झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. याप्रकरी संभाजीराव रामंचद्र जगताप (वय 73, रा. कोडोली, ता. कराड), सर्जेराव रघुनाथ लोकरे (52, रा. येरवळे), अशोक मारुती जगताप (56, रा. वडगाव हवेली), उदयसिंह प्रतापराव शिंदे (वय 50, रा. बोरगाव, ता. वाळवा), बाळासाहेब दामोदर निकम (वय 69, रा. शेरे), चंद्रकांत विठ्ठल भुसारी (वय 70, रा. टेंभू) महेंद्र ज्ञानू मोहिते (वय 56, रा. वाटेगाव, ता. वाळवा) वसंत सीताराम पाटील (वय 68, रा. नेर्ले, ता. वाळवा) या आठ माजी संचालकांना पोलिसांनी अटक केली. त्यापैकी चंद्रकांत भुसारी, उदय शिंदे व महेंद्र मोहिते यांना तीन दिवास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मागील तीन वर्षापूर्वी कारखान्याची सत्ता अविनाश मोहिते यांच्या गटाकडे होती. सन 2014-15 च्या गळीत हंगामासाठी ऊस वाहतूक करणार्‍या 784 वाहनधारकांना न घेतलेल्या कर्जापोटी प्रत्येकी 7 लाख रुपये अशा 58 कोटी रुपये परतफेड करण्याच्या नोटिसा बँक ऑफ इंडियाने पाठविल्या होत्या. त्यापैकीच यशवंत पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनाही बँकेने नोटीस बजवली होती. त्यांनी कारखान्याकडे 2013-14 मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचे आरसी बुक, टीसी बुक, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड अशा कागदपत्रांच्या झेरॉक्स दिल्या होत्या. पण करारानुसार ठरलेली उचल न दिल्याने वाहतूकदाराने तोडणी वाहतुकीसाठी वाहन लावलेच नाही, तरीही शेतकर्‍याच्या नावे 7 लाख रुपयांचे कर्ज उचलले असल्याची माहिती नोटिशीद्वारे त्यांना मिळाली. कर्ज वसुलीच्या नोटिसा मिळाल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव उत्तमराव पाटील, तत्कालीन अधिकारी व बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांनी संगनमताने खोट्या सह्या करून शेतकर्‍यांच्या नावे कर्ज घेतल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार कृष्णाच्या माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बँकेच्या अधिकार्‍यांची नावे आहेत. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सध्यातरी त्यांना अटक करण्यात आली नाही.