Breaking News

शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी आज मेढ्यात मोर्चा

सातारा, दि. 17 (प्रतिनिधी) : मेढा तालुक्यातील शेतकर्‍यांंचा सातबारा कोरा व्हावा, संपूर्ण कर्जमाफी करण्याबरोबर वीजजोडणी तत्काळ मिळावी, पिण्याचे पाणी मिळावे, मेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशा मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने मेढा येथील तहसील कार्यालयावर सोमवारी दि. 17 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. एस. पार्टे (गुरुजी) यांनी दिली. या मोर्चामध्ये तालुक्यातील शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी होणार आहेत.
यावेळी शिवसेनेचे जावळी तालुकाप्रमुख प्रशांत तरडे, संजय सुर्वे, तसेच सचिन करंजेकर उपस्थित होते. वीज मंडळ शेतकर्‍यांसह सामान्य माणसाची लूट करीत आहे. बिलांमध्ये अनेक कर लादले जात आहेत, परंतु अखंड वीजपुरवठा होत नाही. शेतकर्‍यांना त्वरित वीज कनेक्शन दिले जात नाही. दिल्ली, गुजरातमध्ये दोन रुपये 30 पैसे युनिटचा दर असून, महाराष्ट्रात सहा रुपयांपेक्षा अधिक का? असा सवाल पार्टे यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी प्रशांत तरडे, संजय सुर्वे यांनीही मनोगत व्यक्त करुन सोमवारी दि. 17 रोजी मेढा बस स्थानक येथून सकाळी 11 वाजता सुरु होणार्‍या मोर्चास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.