Breaking News

सुपरओव्हरमध्ये मुंबईचा विजय, गुजरातचा 5 धावांनी पराभव

राजकोट, दि. 30 - मुंबई आणि गुजरातमध्ये सुपरओव्हर खेळवून झालेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. आयपीएलच्या दहाव्या पर्वातील ही पहिलीच सुपरओव्हर होती. रवींद्र जाडेजानं अखेरच्या चेंडूवर कृणाल पंड्याला धावचीत केल्यानं मुंबई आणि गुजरात संघांमधला राजकोटचा आयपीएलचा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे उभय संघांमधल्या सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये ठरवण्यात आला.
सुपरओव्हरमध्ये मुंबईने गुजरातसमोर 12 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. सुपरओव्हरमध्ये मुंबईच्या 2 बाद 11 धावा झाल्या. सुपरओव्हरमध्ये तीनच फलंदाज खेळवता येत असल्याने पाचव्या चेंडूतच मुंबईचा गाशा गुंडाळला. त्यावेळी गुजरातसाठी सोपं वाटणारं आव्हान गुजरातला मात्र पेलवता आलं नाही. गुजरात लायन्सनं मुंबई इंडियन्सला विजयासाठी 154 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईच्या गोलंदाजांनी गुजरातला 20 षटकांत 9 बाद 153 धावांवर रोखलं. कृणाल पंड्यानं तीन तर लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. हरभजन सिंगनंही एक विकेट काढली. गुजरातकडून ईशान किशननं 35 चेंडूंत 48 धावांची खेळी केली. रवींद्र जाडेजानं 28 तर अँड्र्यू टायनं 25 धावा केल्या.