Breaking News

एअरटेलची इंटरनेट टीव्ही सेवा सुरु, डिशची गरज नाही

मुंबई, दि. 30 - एअरटेलने आपल्या इंटरनेट टीव्ही सेवेची घोषणा केली असून, या नव्या सेवेत सेट टॉप बॉक्सच्या मदतीने 500 पेक्षा जास्त सॅटेलाईट चॅनेल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच या सेवेतून तुम्हाला नेटफ्लिक्स, यूट्यूब, गूगल प्ले गेम्सचा आनंद टीव्हीवर घेता येणार आहे. विशेष म्हणजे, इंटरनेट हा इपीटीव्ही असल्यानं या नव्या सेवेला तुम्हाला डिशची गरज भासणार नाही.
भारती एअरटेलचे सीईओ आणि संचालक सुनील तालदार यांनी सांगितले की, सध्या देशभरात 32 इंचापेक्षा मोठ्या स्क्रिनचे जवळपास तीन कोटी टेलिव्हीजन सेट आहेत. यापैकी एक कोटी ग्राहक स्मार्ट टीव्हीचा वापर करतात. एअरटेलच्या या नव्या सेवेत सेट टॉप बॉक्सच्या मदतीने उर्वरित टीव्हीदेखील स्मार्ट होऊ शकतील. तालदार पुढे म्हणाले की, यासाठी एअरटेलच्या सेट टॉप बॉक्सच्या सबस्क्रिप्शनसाठी वर्षाला 7,999 रुपये मोजावे लागतील. तर एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनसाठी 700 रुपये खर्च द्यावे लागतील. तसेच जुन्या सव्वा कोटी डीटीएच ग्राहकांना 3999 रुपये खर्च करुन, नवा सेट टॉप बॉक्स बसवता येईल. यात त्यांना एक महिन्यांचं सबस्क्रिप्शन मिळेल.
या नव्या सेट टॉप बॉक्सवर इंटरनेटची सुविधा वायफायच्या माध्यमातून उपलब्ध होईल. या वायफाय सेवेसाठी तुमच्याकडे एअरटेलचं इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचं नाही. पण जर तुमच्याकडे एअरटलेचं इंटरनेट कनेक्शन असेल, आणि तुम्ही 999 पेक्षा अधिकचे पॅकेज वापरत असाल, तर तुम्हाला इंटरनेट टीव्हीसाठी 25 जीबीचा अतिरिक्त डेटा मोफत मिळेल.