Breaking News

आयकर परतावा न केल्यास 4 लाख कंपन्यांची नोंदणी होणार रद्द

नवी दिल्ली, दि. 19 - आयकरचा परतावा न करणार्‍यांविरोधात आयकर विभागाकडून कडक कारवाई करण्यात आली. ज्या कंपनींनी आयकर परतावा केलेला नाही अशा कंपन्याची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय आयकर विभागाकडून घेण्यात आलेला आहे. वर्ष 2013 - 14 आणि 2014-15 मध्ये ज्या कंपन्यांनी आयकर परतावा केलेला नाही अशा 4 लाख कंपन्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. जवळपास एका महिन्यापासून आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र आयकर परतावा करण्याची एक संधी आयकर विभागाकडून कंपन्यांना देण्यात आली आहे. यासाठी आयकर विभागाने कंपन्यांना 30 दिवसांची मुदत दिली आहे. जर या 30 दिवसांत कंपनींनी आयकर परतावा केला नाही तर या कंपन्यांची नोंदणी रद्द केली जाईल, असे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे.