Breaking News

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सातारा जिल्ह्यातील 482 दारू दुकाने बंद होणार

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील ज्या परिसरात 20 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या आहे, त्या परिसरातील दारू दुकाने 220 मीटर अंतराबाहेर असावीत, असा निर्णय न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे जिल्ह्यातील 29 दारू दुकानांना दिलासा मिळाला. मात्र, राज्य व राष्ट्रीय महामा-र्गावरील 20 हजार लोकसंख्येचा परिसर आणि 500 मीटर आत असलेल्या 482 दारू दुकानांना कुलूपे लावावी लागणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका सुनावणीवेळी दिला होता. त्यावेळी जिल्ह्यातील 503 दारुची दुकाने बंद करावी लागणार होती. राज्यासह देशभरात हजारो दारुच्या दुकानांवर गंडांतर आले. त्यामुळे दारु विक्रते संघटनेने फेरविचार करण्याची याचिका दाखल करून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील ज्या परिसरात 20 हजारांपेक्षा कमी लोकसंख्या आहे, त्या परिसरातील दारुची दुकाने 220 मीटर अंतराबाहेर असावीत, असा निर्णय दिला. त्यामुळे जिल्ह्यातील 29 दारुच्या दुकानांना दिलासा मिळाला. 20 हजार लोकसंख्या व 500 मीटरच्या आतील 482 दुकानांना कुलूप लावावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकाने बंद करावी लागणार आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील 44 पैकी 36 वाईन शॉप, 397 पैकी 321 परमीट रुम व बियर बार, 69 पैकी 52 बियर शॉपी, 108 पैकी 72 देशी दारुची दुकाने व एका बियर विक्री दुकानाचा समावेश आहे.
सातारा जिल्ह्यात 621 दारु परवाने देण्यात आले होते. त्यापैकी 110 दुकाने 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्याने बचावली. 220 मीटरबाहेर परंतू 20 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असल्याने ही दुकाने सुरु राहणार आहेत. न्यायालयाच्या आदेशाने दुकानांचे स्थलांतर करण्यासाठी मालकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पूर्वीच्या दुकानाचे ठिकाण बदलावे लागणार असल्याने नव्या जागेचा शोध सुरु झाला आहे. पूर्वीच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी नव्याने दुकान सुरु करायचे आहे, त्याठिकाणची एनओसी घ्यावी लागणार आहे. परवान्यांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे येवू लागले आहेत.