Breaking News

सातारा जिल्ह्यातील 11 हजार शेतकरी कृषिपंपांच्या कनेक्शनच्या प्रतिक्षेत रखडली

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून सुमारे 10 हजार 677 शेतीपंपांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत. विहिरीत पाणी असूनही कृषिपंपावाचून ते पिकाला देता येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला. वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने विदर्भाच्या अनुशेषाखाली पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय चालवला असल्याचे आरोप होत आहेत. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर 2013 पासून  पश्‍चिम महाराष्ट्रातील कृषिपंपांना नवे वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी जिल्ह्यात मार्च 2013 अगोदर 317 वीज कनेक्शन पेंडिंग होती. मात्र, त्यानंतर कृषिपंपांच्या कनेक्शनची पेेंडन्सी वाढत केली. 2014 मध्ये 815, 2015 मध्ये 2 हजार 7, 2016 मध्ये 3 हजार 324 तर सन 17 मध्ये 4 हजार 773 कृषिपंपांच्या वीज जोडण्या प्रलंबित आहेत. कृषिपंपांची तालुकानिहाय जोडणी पाहिली तर काही तालुक्यांवर मोठा अन्याय झाल्याचे दिसते.
सातारा तालुक्यातील 1 हजार 191, कोरेगाव तालुक्यातील 1 हजार 590 तर खटाव तालुक्यातील 1 हजार 992 अशा सर्व मिळून 4 हजार 773 कृषिपंपांच्या वीज जोडण्या प्रलंबित आहेत. अन्य तालुक्यांमध्ये कृषिपंपांची कनेक्शन प्रलंबित आहेत. यासाठी 9 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. घरावरून जाणार्‍या 5 हजार 151  धोकादायक वीज वाहिन्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण काम निधी उपलब्ध नसल्याने थांबले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी करणे गरजेचे आहे. यांसाठी सुमारे 16 कोटी 2 लाख रुपयांचा निधी मिळण्याची गरज आहे. ग्रामीण रस्ते, जिल्हा परिषद अंतर्गत असणारे रस्ते व राज्यमार्ग यांचे नूतनीकरण, दुरुस्तीवेळी  रस्त्यांची उंची वाढल्याने वीज वाहिन्यांची उंची वाढविणे आवश्यक आहे. मात्र त्याप्रमाणे कामे होत नाहीत. सातारा जिल्ह्यात 669 ठिकाणी वीज वाहिन्यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी 8 कोटी 3 लाख रुपयांच्या निधी मिळण्याची गरज महावितरणकडून सांगण्यात आले आहे.