Breaking News

पाण्यासाठी 45 डिग्रीच्या उन्हात शेतकर्‍यांचं 6 दिवसांपासून आंदोलन

सोलापूर, दि. 23 - पाण्यासाठी 45 डिग्रीच्या रणरणत्या उन्हात शेतकर्‍यांचं गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातली आष्टी उपसा सिंचन योजना पूर्ण होईपर्यंत उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची शेतकर्‍यांची मागणी आहे. मात्र पाणी मिळत नसल्याने पाण्याचा मोठा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे थेट सिंचन योजनेसाठी खोदलेल्या कालव्याच्या खड्ड्यात बसून शेतकर्‍यांचं उपोषण सुरु आहे.
जनहित शेतकरी संघटनेनेही शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत शेतकरी आक्रमक झाले आहेत. 21 वर्षांपूर्वी तत्कालीन युती सरकारच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली. चार वेळा आघाडी सरकारचा कालावधी लोटला. राज्यात सत्तांतर झालं. पुन्हा युतीचं सरकार राज्यात सत्तारूढ झालं. नेहमीप्रमाणे शेतकर्‍यांच्या पदरात आश्‍वासनाच्या पलीकडे काहीच पडलं नाही. आता पाणी मिळेपर्यंत मागे हटायचं नाही, असा निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे.