Breaking News

दारुबंदीचा फटका पेट्रोलला, पेट्रोल 3 रुपयांनी महागलं

मुंबई, दि. 22 - वाहनधारकांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. पेट्रोलच्या दरात तब्बल 3 रुपये वाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये वाढ केल्याने मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर भडकले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील दारु दुकाने बंद झाली आहेत. त्यामुळे त्यापासून मिळणारा महसूल बुडाला आहे.
ही तूट भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने हा पर्याय शोधला आहे. मात्र दारुचा महसूल भरुन काढण्यासाठी सरकारने थेट पेट्रोलचे भाव वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला चाट लावल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहेत. एकीकडे सरकार पेट्रोल-डिझेलचे दर रोजच्या रोज निश्‍चित करण्याच्या तयारीत आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारने अचानक पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी वाढ केल्याने, सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्य सरकारने आज व्हॅट लागू केला असला तरी 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. त्यावेळी सर्व कर रद्द होणं अपेक्षित आहे. त्यावेळी पेट्रोलच्या दरावर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.