Breaking News

भियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी तब्बल 3 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी केले अर्ज

पुणे, दि. 02 - राज्यात अभियांत्रिकीच्या गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रवेशाअभावी सुमारे 50 हजार जागा रिक्ता राहत आहे. याउलट यंदा अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी अनिवार्य एमएचटी-सीईटीसाठी तब्बल 3 लाख 87 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. गतवर्षीची तुलना करता यंदा अर्जामध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र शाखेला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत.
राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. मागील वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्यस्तरावरील सीईटीमार्फतच देण्यात आले होते. मात्र, यावर्षीपासून वैद्यकीयचे सर्व प्रवेश राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परीक्षेद्वारे होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या सीईटीतून केवळ अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणचे प्रवेश दिले जाणार आहेत. यावर्षीच्या प्रवेशासाठी 11 मे रोजी सीईटी घेतली जाणार आहे.
या सीईटीसाठी 14 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत होती. या मुदतीत सुमारे 3 लाख 77 हजार अर्ज आले होते. 24 ते 30 मार्च दरम्यान सुमारे 11 हजार विद्यार्थ्यांनी विलंब शुल्क भरून अर्ज केले आहेत. त्यामुळे एकूण अर्जांची संख्या 3 लाख 87 हजारांवर गेली आहे. यापैकी सुमारे 95 हजार अर्ज फार्मसीसाठी, तर उर्वरित अर्ज अभियांत्रिकी प्रवेशासाठी आले आहेत, असे तंत्रशिक्षण विभागाने सांगितले.
सीईटीसाठी यावर्षी आलेल्या अर्जांमध्ये सुमारे 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी सीईटीमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांचा समावेश असूनही अर्जांची संख्या सुमारे 4 लाख 9 हजार एवढी होती. आता वैद्यकीय अभ्यासक्रम नसूनही 3 लाख 87 हजार अर्ज आले आहेत. ही मोठी वाढ असून बारावीमध्ये गणित विषय असलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये अधिक समावेश आहे. हे सकारात्मक चित्र असून अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
संख्या वाढणे हे सकारात्मक
यंदा अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र शाखेसाठी अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरी प्रत्यक्षात प्रवेशासाठी किती पात्र ठरतात, हे बारावीच्या निकालावरून स्पष्ट होईल. अभियांत्रिकीसाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान 50 टक्को व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 45 टक्के गुण आवश्यक आहे. अर्ज मोठ्या संख्येने आले, हे सकारात्मक आहे. पण प्रत्यक्षात किती प्रवेश घेतील, त्यावरूनच अभियांत्रिकी व  औषधनिर्माण शास्त्र शाखेकडे असणारा कल स्पष्ट होईल, अशी माहिती पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिली.