Breaking News

सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीवर 27 हरकती दाखल

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) : राज्याच्या नगरविकास खात्याने सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी काढलेल्या अधिसुचनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 27 हरकती प्राप्त झाल्या. हरकतींमध्ये शाहूपुरी, विलासपूरमधून स्वतंत्र नगरपंचायतीची मागणी होत आहे. या परिसरातील गृहनिर्माण संस्था तसेच नागरिकांनी हद्दवाढीत समावेश करण्यास प्रखर विरोध दर्शवला आहे. सूचना व हरकतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्यासमोर सुनावणी होणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांच्या शिफारशींसह राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.
नगरविकास खात्याने 22 मार्च रोजी सातारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीची उद्घोषणा केली होती. त्यानंतर 23 मार्चपासून सूचना व हरकती मागवल्या होत्या. हरकतींमध्ये कराच्या भीतीने गृहनिर्माण संस्थांनी हद्दवाढीला विरोध केला आहे. ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपंचायतीत करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही उपनगरांतील नागरिकांकडून नगरपालिकेच्या कामाजावर नाराजी दिसून येत आहे. मात्र, त्रिशंकू  भागाकडून हद्दवाढीचे समर्थन करुन सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ करावी, अशी मागणी केली आहे.
महालक्ष्मीनगर, गोरखपूर येथील नितीन लोखंडे यांनी खेड, पिरवाडीमधील स. नं. 9 चा समावेश सातारा हद्दवाढीत करावा. संदीप चव्हाण, सिध्दीविनायक हेरिटेज यांनी खेडमधील स. नं. 102/1 क हा भाग हद्दवाढीत घ्यावा. तसेच झॅल शाम कपूर (रा. सदरबाजार) यांनी सि. स. नं. 106 चा सातारा हद्दवाढीत समावेश करावा, अशी मागणी केली आहे. सुनील पवार (रा. जयमल्हार हौसिंग सोसायटी खेड) यांनी सि. स. नं. 100 व पोटहिस्सा यांचा समावेश हद्दवाढीत करावा, अशी सूचना केली. याच परिसरातील हणमंत पवार यांनी पोटहिस्सा याचा समावेश हद्दवाढीत करावा, अशी मागणी केली. एम. एच. ओक (रा. अर्कशाळानगर कॉलनी) यांनी स. नं. 327 ते 334 करंजे तर्फ सातारा या स. नं. चा समावेश हद्दवाढ प्रस्तावात करावा, अन्यथा हा भाग त्रिशंकू राहील असे म्हटले आहे.
शासकीय कर्मचार्‍यांची श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. गडकर आळी तसेच श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था लि., गेंडामाळ नाका, करंजे तर्फ सातारा यांनी सातारा हद्दवाढीस विरोध करुन शाहूपुरी ग्रामपंचायतीचे रुपांतर स्वतंत्र नगरपंचायतीत करावे. तसेच सभापती, सेक्रेटरी, सदानंद सहकारी भाडेकरु मालकी गृहनिर्माण संस्था, करंजे तर्फ सातारा, चेअरमन, सातारा जिल्हा परिषद सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था, करंजे तर्फ सातारा, दत्तदर्शन सोसायटी शाहूपुरी येथील ललित सातघरे, अनुसया लिमये (रा. रांगोळी कॉलनी, शाहूपुरी), नंदकुमार काटे (रा. जयहिंद कॉलनी), राजेंद्र लवळे (रा. जि. प. कॉलनी), मिलिंद कदम (रा. जयहिंद कॉलनी), चेअरमन, क्रांती सहकारी गृहनिर्माण संस्था (करंजे तर्फ सातारा), मोहन कुलकर्णी (रा. खटावकर कॉलनी), सहजीवन हौसिंग सोसायटी तसेच सरपंच, शाहूपुरी ग्रामपंचायत यांनी ग्रामसभेचा ठराव घेवून ग्रामपंचायतीचा सातारा हद्दवाढीत समावेश न करता स्वतंत्र नगरपंचायतीची निर्मिती करण्याची मागणी केली आहे. जयविजय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, चिंतामणी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, यशवंतराव सहकरी सहभागीदारी गृहनिर्माण संस्था, मर्या. करंजे तर्फ गडकर आळी शाहूपुरी, ओंकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. करंजे, मारुती कदम (रा. समता पार्क, विलासपूर) मधील उमाकांत मोरे, श्रेयस बोधे, चंद्रकांत चौधरी, महेश पवार, वि. म. काकतकर, जोतीराम काकडे, प्रा. शिवदास जाधव, लीना निकम, सारंग जाधव यांनी हद्दवाढीस विरोध दर्शवला. दरम्यान, हद्दवाढीसंदर्भात मुख्याधिकारी, भूमी अभिलेख उपअधिक्षक, गट विकास अधिकारी तसेच ग्रामसेवकांना अभिप्राय मागवण्यात येणार आहे.