Breaking News

गेल्या सहा महिन्यांत 175 चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित

सातारा, दि. 9 (प्रतिनिधी) : वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कडक धोरण अवलंबून गेल्या सहा महिन्यांत 175 चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केले. गाडी चालविताना मोबाईलवर बोलणारे व मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहेत.
वाहतूक नियमांचे व मोटर वाहन कायद्यातील तरतुदींचे वाहनधारकांकडून पालन होणे आवश्यक असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याबरोबर अपघातांची संख्याही कमी होते. वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकार्‍यांकडून नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. दंडात्मक कारवाईव्यतिरिक्त आपण केलेल्या चुकीची जाणीव चालकाला व्हावी, यासाठी त्याचा वाहन चालविण्याचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना आहेत. सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी अधिकाराचा वापर करून गेल्या सहा महिन्यांत विविध कारणांसाठी 175 जणांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केले आहेत.
वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, वाहनातून क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणे, माल वाहतुकीच्या वाहनांतून प्रवासी वाहतूक करणे, मोबाईलवर बोलत गाडी चालवणे, दारू पिऊन वाहन  चालविणे, हेल्मेट न वापरणे तसेच सिटबेल्ट न लावणे, अशा विविध कारणांसाठी या कारवाया करण्यात आल्या. दारू पिऊन वाहन चालविणे तसेच गाडी चालविताना मोबाईलचा वापर केल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या दोन कारणांसाठी कडक धोरण स्वीकारत संबंधित वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित केला आहे.