Breaking News

आयपीएल 10 चा रणसंग्राम आजपासून, हैदराबाद-बंगळुरु भिडणार

मुंबई, दि. 05 - आयपीएलच्या दहाव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या हैदराबाद सनरायझर्ससमोर गतवेळच्या उपविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रात्री आठ वाजल्यापासून खेळवण्यात येईल.
डेव्हिड वॉर्नरचा गतविजेता सनरायझर्स हैदराबाद यंदाच्या मोसमातही आयपीएलच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरण्याच्या इराद्यानं सलामीच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल. हैदराबादच्या फलंदाजीची धुरा ही प्रामुख्यानं कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर राहिल. गेल्या मोसमात वॉर्नरनेच हैदराबादच्या फलंदाजीचा भार वाहिला होता. वॉर्नरच्या साथीनं सलामीला उतरणारा शिखर धवन, धडाकेबाज युवराज सिंग आणि केन विल्यमसन हे तिघंही हैदराबादच्या फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ असतील. बांगलादेशचा मुस्ताफिजूर रेहमान खांद्याच्या दुखापतीमुळे सलामीच्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत आशीष नेहरा, भुवनेश्‍वर कुमार आणि बरिंदर सरन हे त्रिकूट हैदराबादच्या वेगवान आक्रमणाची सूत्रं सांभाळतील.
बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या सामन्यात खेळू शकणार नाहीत. विराटला उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे किमान एक आठवडा सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे. डिव्हिलियर्सही सध्या पाठीच्या दुखापतीमुळे विश्रांती घेत आहे. बंगळुरुच्या लोकेश राहुल आणि सरफराझ खान यांना तर दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल मोसमातूनच माघार घ्यावी लागली आहे. या परिस्थितीत बंगळुरुच्या फलंदाजीची जबाबदारी ख्रिस गेल, केदार जाधव आणि शेन वॉटसनच्या खांद्यावर राहिल. विराटच्या अनुपस्थितीत वॉटसनच बंगळुरुच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळणार आहे.