Breaking News

वाहनचालकास मारहाण करून लुटणार्‍या दोघांना 10 वर्षे सक्तमजुरी

अहमदनगर, दि. 21 - पुणे येथील विमानतळावर नगरला येण्यासाठी कार भाड्याने घेऊन येतांना रस्त्यात वाहनचालकास मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम लुटून कार सहीत पलायन करणार्‍या दोन जणांना अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश व्ही.जी.मोहिते यांनी 10 वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
निलेश रावसाहेब शिंदे (वय 26) व अभिलेष शंकर पटेल (वय 22), दोघेही राहाणार कर्जत, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार) अशी सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2015 मध्ये आरोपी शिंदे व पटेल या दोघांनी पुणे येथील लोहगाव विमानतळा पासून नगर कडे येण्यासाठी प्रवीण गुंडप्पा (राहणार मंडवा,पुणे) यांची स्विफ्ट डिझायनर गाडी भाड्याने घेतली होती. पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथे गाडी आली असता लघुशंका करण्याच्या बहाण्याने त्यांनी गाडी थांबविण्यास सांगितले. त्यावेळी आरोपींनी गाडीचा चालक प्रवीण याच्या हातावर चाकूने वार करून त्याचे हातपाय बांधून त्याला वाघुंडे गावाजवळील पुलाखाली टाकून दिले. त्याच्याजवळील रोख रक्कम व गाडी गेऊन आरोपींनी पलायन केले. प्रवीण गुंडाप्पा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या प्रकरणाची सुनावणी अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश व्ही.जी मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकारच्या वतीने अ‍ॅड.अनिल सरोदे यांनी बाजू मांडली. सुनावणी दरम्यान 9 साक्षीदार तपासम्यात आले. त्यामध्ये फिर्यादी प्रवीण गुंडाप्पा,तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.आर.गोरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने जबरी चोरी प्रकरणी दोन्ही आरोपींना दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.