Breaking News

पुणेकरांसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत 100 इलेक्ट्रॉनिक बसेसची खरेदी ?

पुणे, दि. 17 - स्मार्ट पुणे सिटी या प्रकल्पाअंतर्गत पुणेकरांसाठी 100 इलेक्ट्रॉनिक बसेस खरेदी करण्यात येणार असल्याचा निर्णय शनिवारी पार पडलेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला. 
त्यापुर्वी या बसची प्राथमिक तत्वावर चाचणी घेऊनच त्यानंतर खरेदीच्या विचार करणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले. याकरीता चाचणी घेण्यासाठी तीन कंपन्यांनी तयारी दर्शवली असून लवकरच या ई बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.
स्मार्ट सिटीच्या या 10 व्या बैठकीस स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार , पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे आदी उपस्थित होते.
16 कंपन्यांनी या 100 ई बस पुरवण्याची तयारी दर्शवली होती. यापैकी 11 कंपन्या बस पुरवण्यास इच्छुक आहेत. मात्र या बस खरेदी करण्याअगोदर बसची 3 महिने चाचणी घेण्यात यावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आणि चाचणीसाठी कंपन्यांनी या बसेस मोफत पुरवाव्यात असा निर्णय घेण्यात आला. यासाठी 3 कंपन्यांनी तयारी दर्शवली असून असून त्या 1 बस अशा तीन बस महापालिकेला देणार आहे.
या बसचे रूट पीएमपी प्रशासन ठरवणार असून चालक बस पुरवणार्‍या कंपनीचा असणार आहे तर वाहक पीएमपी प्रशासन नेमणार आहे.
 या बस पूर्णपणे लिथियम बॅटरीवर चालणार्‍या आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे . या बससाठी पालिका मोफत वीज पुरवणार आहे. प्रत्येक बससाठी लागणारा विजेचा खर्च दीड लाख येणार असून 90 दिवसांसाठी 12 ते 13 लाख खर्च अपेक्षित आहे.