सर्वसामान्य रुग्णांना उपचार देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटलची ओळख
। आ.अरुणकाका जगातप । आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत ह्रद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात 315 रुग्णांची तपासणी
अहमदनगर, दि. 20 - सर्वसामान्य रुग्णांना उपचार देणारे आनंदऋषीजी हॉस्पिटलची ओळख राज्यासह देशभरात झाली आहे. आनंदऋषीजी आचार्यांच्या सानिध्यात व त्यांच्या नावाने रुग्णसेवेचे पुण्याचे काम चालू आहे. येथे ह्रद्यरोगसाठी उपलब्ध अत्यल्प दरात शस्त्रक्रियांचा फायदा गरजू रुग्णांना होत असल्याची भावना आ.अरुण जगताप यांनी व्यक्त केली.राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 25 व्या रजत पुण्यस्मृतीदिनानिमित्त श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व.जतनबाई बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत ह्रद्यरोग तपासणी, शस्त्रक्रिया व चिकित्सा शिबीराचे उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक भंडारचे अध्यक्ष अतुल भंडारी, डॉ.विजय भंडारी, उद्योजक बाळासाहेब धाडीवाल, आयोजक माणकचंद बोथरा, संतोष बोथरा, पेमराज बोथरा, सौ.प्रतिभा बोथरा, सतीश बोथरा, राजू शेटीया, डॉ.सुधा कांकरिया, डॉ.प्रकाश कांकरिया, अभय गुगळे, अनिल मेहेर, डॉ.आशिष भंडारी, डॉ.किरण दिपक, डॉ.राहुल अग्रवाल, प्रणेश बोथरा आदिंसह डॉक्टर उपस्थित होते.
पुढे आ.जगताप म्हणाले की, कॅन्सरग्रस्तांसाठी हॉस्पिटलच्या वतीने चालू करण्यात येणारे रेडियेशन युनिट ही काळाची गरज बनली आहे. उद्योग व्यवसाय सांभाळून बोथरा परिवाराच्या वतीने रुग्णसेवेसाठी हॉस्पिटलला दिले जाणारे योगदान कौतुकास्पद आहे. हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचालीमध्ये सर्वांचा टिमवर्क महत्त्वाचा असल्याचे सांगून, हॉस्पिटलच्या समाजोपयोगी उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविकात डॉ.प्रकाश कांकरिया म्हणाले की, जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य सेवाभावाने चालू आहे. संपुर्ण देशात हॉस्पिटलचे नांवलौकिक वाढले आहे. देशाच्या कानाकोपर्यातून सर्व सामान्य घटकातील रुग्ण उपचारासाठी येत आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णांना लवकरच 8 हजार रु. चे एमआरआय 2 हजार रुपये मध्ये उपलब्ध होणार आहे. रुग्णसेवेच्या कार्यात बोथरा परिवाराचे मोठे योगदान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पारस उद्योग समुहाला उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार मिळाल्याबद्दल आ.जगताप यांच्या हस्ते माणकचंद बोथरा यांचा सत्कार करण्यात आला. या शिबीराचे खास वैशिष्टये म्हणजे बायपास सर्जरी 45 हजार रु. तर अॅन्जिओग्राफी 3 हजार रु. मध्ये केली जाणार आहे. तसेच अॅन्जिओप्लास्टी 45 हजार, बीएमव्ही 12 हजार, ह्रद्यातील झडप बदलण्यासाठी 45 हजार रु. या अल्पदरात शस्त्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आल्या असून, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत ह्रद्य शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या शिबीरात 315 रुग्णांची तपासणी करण्यात आली. रुग्णांची तपासणी कार्डीयाक सर्जन डॉ.संदिप तडस, डॉ.स्वप्निल कर्णे, डॉ.वसंत कटारिया, कार्डिओलॉजीस्ट डॉ.किरण दिपक, डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.राहुल एरंडे, डॉ.विनय छल्लाणी, डॉ.प्रविण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.दत्तात्रय अंदुरे यांनी केली.