Breaking News

मार्श-हॅण्ड्सकोम्बने भारताचा विजय हिरावला

रांची, दि. 20 - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली रांचीची तिसरी कसोटी अखेर अनिर्णीत राहिली. ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बनं पाचव्या विकेटसाठी 124 धावांची झुंजार भागीदारी रचून, टीम इंडियाच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. पंचांनी पाचव्या दिवसाचा खेळ थांबवला त्या वेळी ऑस्ट्रेलियानं सहा बाद 204 धावांची मजल मारली होती. पीटर हॅण्ड्सकोम्बने नाबाद 72 धावा केल्या. त्याने तब्बल 200 चेंडू खेळून काढले. तर मार्शने 197 चेंडूत 53 धावा केल्या.
या कसोटीत आदल्या दिवशीच्या दोन बाद 23 धावांवरून ऑस्ट्रेलियाची पहिल्या सत्रात चार बाद 63 अशी अधिकच बिकट अवस्था झाली. त्यामुळं भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. त्या कठीण परिस्थितीत शॉन मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्बनं नेटानं ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. रवींद्र जाडेजानं शॉन मार्शला माघारी धाडून ही जोडी फोडली.   मग रवीचंद्रन अश्‍विननं ग्लेन मॅक्सवेलचा काटा काढला. पण तोवर खूप उशीर झाला होता. ऑस्ट्रेलियानं ही कसोटी वाचवण्यासाठी आवश्यक वेळ खेळून काढला होता.
उपहारापूर्वी इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाला दोन दणके दिले. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 83 अशी झाली होती. आधी इशांत शर्माने सलामीवीर मॅट रेनशॉला पायचीत केलं. मग कर्णधार स्मिथच्या त्रिफळा उडवून जाडेजाने मोठा अडथळा दूर केला. रेनशॉने 44  तर स्मिथने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने आज काच्या 2 बाद 23 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. रेनशॉ आणि स्मिथने संयमी फलंदाजी करत धावसंख्या हलती ठेवली. भारताची आघाडी कमी करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु होती. मात्र इशांतने भेदक गोलंदाजी करत रेनशॉला तंबूत धाडलं. मग पुढच्याच षटकात जाडेजाने कर्णधार स्मिथचा काटा काढला.