Breaking News

बावधनच्या बगाड्याचा युवराज ठोंबरे यांना मान

वाई, दि. 17 (प्रतिनिधी) : पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द आणि वैशिष्ट्यपूर्ण बावधनची बगाड यात्रा शुक्रवार, दि. 17 मार्च रोजी संपन्न होत आहे. या यात्रेमधील बगाड्याचा मान ठरविण्यासाठी होळी पोर्णिमेला रात्री 12 वाजता भैरवनाथाला कौल लावला. यावेळी 36 नवसकर्त्यांमधून बगाड्या होण्याचा मान युवराज धुळा ठोंबरे (वय 24, रा. बावधन) यांना मिळाला.
ठोंबरे यांचे वडील धुळा नथू ठोंबरे यांनी त्यांचे बंधू कबाजी नाथू ठोंबरे यांना पुत्रप्राप्ती व्हावी आणि घरात सुखशांती नांदावी म्हणून सुमारे 25 वर्षापूर्वी भैरवनाथांस नवस केला होता. त्यानंतर कबाजी ठोंबरे यांना अपत्यप्राप्ती झाली. नवसपूर्ती झाल्यानंतर देवाचा नवस फेडण्यासाठी गेली अनेक वर्ष धुळा ठोंबरे कौल घेण्यासाठी बसत होते. परंतू त्यांना आपल्या बंधूंच्या अपत्यप्राप्तीसाठी केलेला नवस फेडण्याची संधी मिळाली नाही. यावर्षी पहिल्यांदा युवराज वडिलांच्या ऐवजी कौलासाठी बसले आणि वडिलांनी केलेला नवस फेडण्याचा मान त्यांना मिळाला आहे. आपल्या चुलत्यासाठी वडिलांनी केलेला नवस फेडण्याची संधी यामुळे युवराज ठोंबरे यांना प्राप्त झाली आहे. ठोंबरे हे व्यवसायाने शेतकरी असून ट्रॅक्टरद्वारे ते शेतीच्या मशागतीची कामे करतात. ते विवाहित असून त्यांना एक बंधू आहे.