Breaking News

शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या गंजीला लागलेल्या आगीत 95 हजारांचे नुकसान

बुलडाणा, दि. 17 -  येथून जवळच असलेल्या जामठी शिवारात 15 मार्च रोजी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतातील गव्हाच्या गंजीला आग लागल्याने व गंजीसह इतर शेतउपयोगी साहित्य जळाल्याने शेतकर्‍याचे 95 हजार रुपयाचे नुकसान झाले. 
जामठी येथील शेतकरी पांडुरंग गोपाळा रावळकर यांचे जामठी शिवारातील जामठी-ढालसावंगी कच्च्या रस्त्यावर असलेल्या गट नंबर 172 मधील शेतामधून विज वितरण कंपनीच्या विज पुरवठा वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारा रात्री वार्‍यामुळे एकमेकांना स्पर्श होवुन शॉर्ट सर्किट झाला. त्यामुळे सदर शेतकर्‍याच्या शेतातील सोंगलेल्या गव्हाच्या गंजीला आग लागली. या आगीने रुद्र रुप धारण करत गंजीच्या आसपास पडलेले. स्प्रिंकलर सेट, लाईन केबल जळुन खाक झाले. त्यामुळे शेतकर्‍याचे 95 हजाराचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच तलाठी गवळी यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा केला. यात गहु गंजी 30 क्विंटल किंमत 30 हजार, स्प्रिंकलर सेट 30 हजार, लाईन केबल बंडल किंमत हजार अशा एकुण 95 हजाराच्या नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालयात सुपूर्द केला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शेतकर्‍यास तात्काळ मदतीची मागणी नागरिकांकडून होत आहे.