Breaking News

जी. के. गुजर ट्रस्टचे कार्य आदर्शवत : हभप बाजीराव महाराज

कराड, दि. 21 (प्रतिनिधी) - मानवी जीवनाच्या प्रवासात अनेकजण जन्माला येतात अन जातात. ज्यांचे कार्य चांगलं असतं त्यांचाच स्मृतीदिन साजरा होत असतो, याचे उदाहरण म्हणजे स्व. भाई गुजर यांनी देशसेवेसाठी जे कार्य केले ते त्यांच्या पश्‍चातही मार्गदर्शक रहावे, या उद्देशाने दरवर्षी स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानाने डॉ. अशोक गुजर त्यांचा स्मृतीदिन साजरा करत आहेत हे फार मोठे काम आहे. सामाजिक बांधिलकी जपत गेली अनेक वर्षे सातत्याने होत असलेले हे कार्य इतरांसाठी अनुकरणीय व आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार मारूतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती हभप बाजीराव महाराज कराडकर यांनी काढले. 
जी. के. गुजर ट्रस्टच्यावतीने डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूटसच्या डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑडीटोरीयममध्ये आयोजित स्वातंत्र्य सैनिकांच्या सत्कारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समितीचे राज्याचे सचिव संपतराव जाधव, सावित्रीबाई फुले स्मृती शताब्दी समितीच्या जयश्री वायदंडे, सत्कारमूर्ती स्वा. सै. गुलाबराव नामदेव अवघडे (दहिवडी), स्वातंत्र्य सैनिक मित्र परिवार सदस्य दत्तात्रय विलास माळी (कासेगाव), शंकराप्पा संसुद्दी, गोवामुक्ती स्वा. सै. अध्यक्ष पतंगराव फाळके, जालिंदर पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सचिव डॉ. माधुरी गुजर यांची उपस्थिती होती.
बाजीराव महाराज म्हणाले, चांगलं कार्य हे चांगल्या विचारामुळे होत असते. आपण जे काही आहोत ते आपल्या विचारामुळे आहोत, म्हणून आपल्या विचारावर लक्ष केंद्रित करा. शब्द क्षणिक आहेत, पण विचार नेहमी जिवंत राहतात आणि युगानयुगे प्रवास करतात. जीवन आनंदी व यशस्वी असावं असं सर्वांना वाटत असतं, पण ते सर्वांना जमतंच असं नाही. यासाठी हवा असतो योग्य गुरू व अचूक मार्गदर्शन. व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. भाईसारख्या विनम्र व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती अशा आहेत की, ज्यांचे स्मृतीदिन अनंतकाल साजरे होत राहतील, असे सांगून त्यांनी डॉ. गुजर कुटुंबियांना धन्यवाद दिले.
प्रास्ताविकात डॉ. अशोकराव गुजर यांनी स्व. भाईंच्या पश्‍चात या विधायक कामातून त्यांची स्मृती चिरंतन रहावी, या उद्देशाने आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असल्याचे सांगितले. यावेळी संपतराव जाधव, सत्कारमूर्ती स्वा. सै. गुलाबराव अवघडे, दत्तात्रय माळी व डॉ. माधुरी गुजर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी डॉ. अशोकराव गुजर, डॉ. माधुरी गुजर व उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार यांनी स्वागत केले. कुंडलचे स्वा. सै. रामचंद्र श्रीपती लाड, स्वा. सै. गुलाबराव अवघडे, दत्तात्रय विलास माळी यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले स्मृतिशताब्दी समितीच्यावतीने वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल डॉ. माधुरी गुजर यांना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते व जयश्री वायदंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेवक कॅप्टन इंद्रजित गुजर, डॉ. विकास घार्गे, शंकरराव खापे, प्रा. एस. ए. डांगे, रामभाऊ कणसे, आनंदराव साळुंखे, ए. एन. मुल्ला, अशोक म्हसवडे, अँड़ अशोकराव मोहिते, बाळासाहेब मोहिते, अनिल गुजर, पांडुरंग साळुंखे, उपसरपंच हणमंत धर्मे, मारूती वडकर, भगवान घोडके यांच्यासह गुजर हॉस्पिटल व रक्तपेढीचे कर्मचारी, सातारा व सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.